भ्रष्टाचाराने पोखरले तिलारीचे कालवे | अधिकारी पुरवतात ठेकेदारांचे चोचले..?

निकृष्ट कामाचा मलिदा कोणाच्या खिशात..? | नेहमीच्या हालअपेष्टा शेतकऱ्यांच्या नशिबात
Edited by: लवू परब
Published on: January 24, 2025 17:57 PM
views 242  views

दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांचे शुक्लकाष्ट काही सुटताना दिसत नाही. ३५ वर्षे झालेले हे जुने कालवे आता शेतकरी व नागरिकांच्या जीवावर बेतले आहेत. तिलारीच्या उजव्या कालव्याला घोटगेवाडी येथे जलवाहिनी कोसळून २ दिवस झाले. कुडासे धनगरवाडी कालव्याला भगदाड पडले. यात लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी कार्यकारी अभियंता विनायक जाधव व संतप्त शेतकरी यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. मात्र, गोव्याला जाणारा कालवा फुटल्याने आता गोव्यातील पाणी पुरवठा महिनाभर बंद राहणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तिलारी प्रकल्पाचा गोव्याला जाणारा कुडासे धनगरवाडी येथील डावा कालवा शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फुटला. लहान पडलेले भगदाड हळू हळू मोठे होऊन संपूर्ण कालव्याचा रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यावेळी कालव्याच्या खाली असलेल्या भोमवाडी व धनगरवाडी येथील शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसून तसेच शेती बागयतीत पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. धनगरवाडी येथील सागर देसाई यांच्या तर घरात पाणी व चिखल दगड जाऊन त्यांना मोठ्या संकटाळा समोर जावे लागले. पहाटेच्या वेळी घरात पाणी शेतीत पाणी नक्की काय झाले हे घरातील माणसांना समजेना. यावेळी सकाळी उठल्या उठल्या या लोकांना चिखल, पाणी, दगड बाहेर काढण्याचं  काम लागले. याबाबात या लोकांनी तिलारी विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. 

ठेकेदार शेतकरी यांच्यात आरोप प्रत्यारोप 

दरम्यान, कुडासे धनगरवाडी येथे  कालवा फुटला ही घटना शेतकरी व ठेकेदारांना समजताच ते घटना स्थळी आले. यावेळी शेतकरी व ठेकेदार यांच्यात शाब्दिक आरोप प्रत्यारोप झाले. यावेळी सदरील याच ठिकाणी केलेले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने हा आज  प्रकार घडला असल्याचे शेतकरी म्हणाले. तर ज्या ठिकाणी कालवा फुटला त्याठीकाणचं काम मी केले नाही विनाकरण आरोप करू नका असे ठेकेदार टोपले म्हणाले. 

अधिकाऱ्यांवर मनूश्यवधाचा गुन्हावा दाखल करा*

 घटना स्थळी असलेले. सुगंध नरसुले व दादा देसाई म्हणाले की सदर तिलारीचे दोन्ही कालव्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी घोटगेवाडी येथे कालव्याची पाईप लाईन फुटली ही घटना ताजी असताना शुक्रवारी ही घटना घडली याला सर्वस्वी तिलारी प्रकल्पाचे अधिकारीच जाबाबदार आहेत. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या

पहाटे फुटलेल्या कलव्याच्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. घरादारात पाणी, माती, चीखल घुसून मोठे नुकसान झाले. तर येथील काजू, नारळ, सुपारी या शेती बागयतीत पाणी दगड चिखल गेल्याने मोठे नुकसान झाले. याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी यावेळी दादा देसाई, सुगंध नरसुले आदी शेतकऱ्यांनी मागणी केली.

महिनाभर पाणी बंद राहणार

कुडासे भोमवाडी येथे फुटलेल्या कालव्याची परिस्तिथी पाहता गोव्याला जाणारा पाणी पुरवठा साधारणता एक महिनाभर बंद राहणार आहे. या पाणी बंद मुळे येथील कुडासे, मणेरी, सासोली, वाघमळा, तसेच गोव्यातील हसापूर, चांदेल आदी गावातील शेतकरी, गुरे मालक यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तिलारीच्या पाण्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याचा विचार करता गोवा व महाराष्ट्र सरकारने तात्काळ उपाय योजना करून पाणी सुरळीत करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.