
दोडामार्ग : तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालवा फुटल्यामुळे गोव्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. जरी कालव्याचे काम सुरु असले तरी त्याचा परिणाम तालुक्यातील व गोव्यातील शेतकऱ्यांवर झाला आहे.
तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे डावा व उजवा असे दोन कलवे आहेत. या कालव्यांची परिस्थिती पाहिली तर सर्वत्र कालव्यांचे काँक्रीट उचलले आहे. त्यामुळे कधी कुठे कालवा फुटेल हे सांगता येत नाही. 4 दिवसांपूर्वी कुडासे भोमवाडी धनगरवाडी येथे फुटलेल्या कालव्या मुळे येथील लगतच्या गोवा राज्यावर मोठा परिणाम झाला आहे. गोव्यातील हसापूर, चांदेल कासारवर्णे वैगरे गावातील शेतकरी, गुराखी यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नागरिकांनी पाणी लवकर सोडण्याची मागणी केली आहे.
गोव्यातील गुराख्यांची मोठी तारांबळ
दरम्यान तिलारीचा गोव्याला जाणारा डावा कालवा 4 दिवसांपूर्वी फुटला त्यामुळे गोव्यातील पाणी बंद झाले. आणि याचा परिणाम गोव्यातील शेतकरी, गुराखी यांच्यावर झाला. हसापूर, चांदेल, कासारवर्णे या गावातील गुराखी यांना गोठ्यात लागणारे पाणी नसल्याने गुरांचे पाण्याविना हाल झाले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी व गुराख्यांनी तिलारी अधिकाऱ्यांना विनंती केली की पाणी लवकर सोडा आमच्या गुरांचे हाल होत आहेत.