
दोडामार्ग : तिलारी कालवा फुटण्याचे प्रकार काही केल्या थांबेनासे झाले आहे. जसं आभाळ फाटलं तर ठिगळ कुठं लावणार असं बोललं जातं अगदी तशीच अवस्था सध्या तिलारी कालव्यांची झाली आहे. त्यामुळं ३०ते ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या या संपूर्ण कळव्यांचे नूतनीकरण करणं हीच काळाची गरज आहे.
शनिवारी सकाळीच तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला कुडासे भोमवाडी येथे भले मोठे भगदाड पडले. आणि एकच आहाकार उडाला. लाखो लिटर पाणी या भागदाडाने बाहेर पडून तेथील शेतकऱ्यांच्या शेती बागयतीत घुसून नुकसान झाले. तर कुडासे रस्त्याला सुद्धा कालव्याच्या पाण्याने नदीचे रूप मिळाले. दरम्यान ही घटना समजताच तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी घटना स्थळी भेट देऊन कालव्याचे पाणी तात्काळ बंद केले.
त्यानंतर कालव्याची व नुकसानीचीही पाहणी केली. या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करुन कालव्याचे काम करण्यात येणार असल्याचेही माहिती यावेळी जाधव यांनी दिली.
गोवा व महाराष्ट्र यांच्या सयुक्त विद्यमाने उभारलेल्या तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला शनिवारी सकाळी भगदाड पडून मोठी दुर्घटना घडली आहे. कुडासे भोमवाडी येथे गतवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून कालव्याचे काम करण्यात आले होते. आणि एक वर्ष पूर्ण होण्या अगोदरच हा कालवा फुटण्याची घटना आज शनिवारी घडली. यावेळी भेडशी, कुडासे या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान लगतच्या शेती बागायतीत कालव्याचे लाखोलीटर पाणी घुसल्याने तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
तिलारी प्रकल्पाच्या कालवे दर्जाहीन : युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे
दरम्यान गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला भगदाड पडले ही घटना सकाळी घडली आणि अधिकारी १२ वाजता घटना स्थळी येतात. ही तालुक्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. याठीकाणी तिलारी प्रकल्पाच्या दोन्ही कालवे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने आपल्याला हवे त्याठिकाणी करोडो रुपयाची टेंडर काढून पैसे खाण्याची कामे चालू आहेत. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी दुर्लक्ष करून खरोखरचं काम करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी मलमपट्टी करून ठेकेदाराला वाटेल आणि त्यांना सोईस्कर होईल अशा ठीकाणी नवीन नवीन टेंडर ओपन करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि जि घटना घडली त्याठीकाणी कोणतीही जीवित हानी घडली असती तर तिलारी पाठबंधारे विभाग यांनी जबाबदारी घेतली असती काय? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. इतकंच नव्हे तर युवा सेना व उबाठा पक्षाच्या माध्यमातून तिलारी प्रकल्पाचा मोठा भ्रष्टाच्यार लवकरच चव्हाट्यावर आणू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कालवा कामे दर्जात्मक व्हावीत : संजय गवस
गोवा व महाराष्ट्र यांचा सयुक्त प्रकल्प पण महाराष्ट्रमध्ये केलेले कालव्याचे काम व गोवा राज्यातील काम यात जमीन आसमानचा फरक आहे. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करून कालवे प्रकल्प यांची वाट लावली आहे. उलट गोव्यातील कालव्यांचे काम सुस्थितीत केलेले आहे. ही आपल्या सरकारला लाजिरवानी गोष्ट आहे. येणाऱ्या काळात या सर्व कालव्यांचे स्ट्रक्चर ऑडिट होण्यासाठी याविरोधात आवाज उठवला जाणार आहे असे गवस म्हणाले.
तिलारी कालव्याचे लवकरच रिनोवेशन होणार : कार्यकारी अभियंता जाधव
तिलारी कालव्याच्या किमी 13 मध्ये जो भगदाड पडला आहे. ते पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर त्याला तात्काळ माती किंवा चिरे काँक्रिटीकरण करून दुरुस्त करण्यात येणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे तिलारी कलव्याचे रिनोवेशन करण्याचे काम सुरु आहे. त्याला आणि रिनोवेशनच काम अंतिम टप्यात झालं आहे. त्यामुळे भविष्यात पूर्ण कालवा व्यवस्थित होणार आहे. दरम्यान कालवा फुटीच्या पाण्यामुळे कोणाचं काय नुकसान झाल आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तहसीलदार यांना पंचनामे करण्याबाबत कळविले आहे. नागरिकांनी घाबरू नये आम्ही साईडवर आहोत. त्यामुळे कोणीही घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
गोवा राज्यात मोठा परिणाम
दरम्यान गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने महिनाभर कालव्याचे पाणी बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्याला जाणारे पाणी बंद राहिले तर येथील गोवा पर्वरी, बार्देश येथील MIDC मध्ये व लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल होणार आहेत. असे यावेळी गोवा प्रकल्पचे अधिकारी आनंद पंचवाडकर यांनी सांगितले आहे. दरम्यानी त्यांनी घटनास्थळी आज पाहणी करून तसा अहवाल गोवा सरकारला देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.