
दोडामार्ग : कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीसोबत आपल्या लहान मुलाला ठेवून मार्गशीर्ष गुरुवार पूजण्यासाठी घरी परतणाऱ्या पत्नीवर काळाने घाला घातला. गोवा ओझरी येथील शुभांगी शिवा परब, वय 60 असं तीच नाव आहे. आपल्या मोठ्या मुलासोबत स्कॉर्पिओ कारने येत असताना हा अपघात घडला. कार अचानक कालव्यात कोसळल्याने अपघात झाला आणि तिचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा मुलगा किरकोळ जखमी झाला. सचिन शिवा परब, दोघेही रा. ओझरी, ता. पेडणे, गोवा असे जखमी मुलाचे नाव आहे. साटेली भेडशी भोमवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री 2.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अपघाताचा थरार
शुभांगी परब यांचे पती शिवा परब हे गोवा येथील शिक्षण विभागात कार्यरत होते. अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल केले होते. तर त्यांचा मोठा मुलगा सचिन परब हा गोव्यातील फायर ब्रिगेड येथे कामाला आहे. वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करावी व मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असल्याने लक्ष्मीपूजन करण्यासाठी आईला घरी आणावे यासाठी सचिन हा आपल्या लहान भावाला घेऊन मामाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने बुधवारी कोल्हापूरला गेला. त्यानंतर सायंकाळी शुभांगी परब यांनी आपल्या लहान मुलाला आपल्या पतीसोबत ठेवून मोठ्या मुलासह घरी येण्यास निघाल्या. स्कॉर्पिओ गाडी मामाची देऊन आपली गाडी घेऊन घरी जाणार या हेतूने ते भाडशी भोमवाडी या मार्गाने कुडासे वानोशी वाडी येथे जात होते. वाटेत येत असताना ते गप्पा गोष्टी करत येत होते. त्या दिशेने जात असता साटेली भेडशी येथील भोमवाडी मुख्य रस्त्यावरील तिलारीच्या डाव्या कालव्याजवळ त्यांची गाडी आली असता आई गप्प का आहे म्हणून तिला हाक मारली तरी तिने आवाज दिला नाही म्हणून मुलगा सचिन याने मागे वळून पाहिले. त्याच क्षणी सचिनचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात कोसळली. आणि गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली शुभांगी परब सरळ समोरील गाडीच्या काचेवर आदळली व तिला जबर मार बसला.
सचिनचे प्रयत्न अपुरे पडले
कालव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने गाडी वाहून जाऊ लागली. सचिन धिटाईने गाडीतून बाहेर पडला व आईलाही गाडीतून बाहेर काढण्यासाठी त्याने शर्थीचे प्रयत्न केले. शेवटी त्याने बाहेर पडत आजूबाजूच्या लोकांना उठवून आणले त्यातच त्याचा वेळ गेला. त्याने आपल्या आईला गाडी बाहेर काढून गाडीच्या टपावर ठेवले. सचिनने स्थानिकांच्या मदतीने शुभांगी परब यांना तात्काळ लगतच्या साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र शुभांगी परब यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
कालव्यातील पाण्याचा प्रवाह केला बंद
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. शिवाय सर्व हकीकत सांगून कालव्यातील पाणी बंद करण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी देखील वेळ न दवडता कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद केला. मात्र अपघातामुळे गाडी तब्बल ५० मीटर वाहून गेली होती. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच तेदेखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांचे जाबजबाब नोंदवून पंचनामा केला.
स्थानिक युवकांनी गाडी काढली बाहेर
कालव्यात गाडी पडल्यानंतर गाडीत पूर्णतः पाणी गेले. त्यामुळे ती बाहेर काढायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला. काही स्थानिक युवकांनी पुढाकार घेत गाडी १०० मीटर ढकलत नेली. त्यानंतर कालवालगतच्या रस्ता ते कालव्यात उतरलेल्या रॅम्प वरून दुसऱ्या गाडीच्या सहाय्याने बाहेर काढली.