
कुडाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ तहसीलदार कार्यालय परिसरात प्रचंड राजकीय हालचाली पाहायला मिळणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा दिवस महत्त्वाचा असल्याने प्रशासनाकडून अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दैनंदिन कामकाज बंद ; केवळ उमेदवारांनाच प्रवेश
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आज तहसीलदार कार्यालयातील इतर सर्व सामान्य कामे बंद ठेवण्यात आली आहेत. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस प्रत्येक व्यक्तीची कडक तपासणी करत आहेत. केवळ जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणाऱ्यांनाच ओळख पटवून आत सोडले जात आहे.
दुपारी तीन नंतर कोणालाही प्रवेश नाही
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी ३:०० वाजेपर्यंतच आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दुपारी ३ नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जदारांना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. या वेळेच्या मर्यादेमुळे उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची चांगलीच धावपळ उडालेली दिसत आहे.
राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन ; तोबा गर्दी
आज सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आपले अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याने तहसील कार्यालयाबाहेर तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता, परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले असून वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
महत्त्वाची सूचना :
नागरिकांनी आज अत्यावश्यक कामाशिवाय तहसील कार्यालय परिसरात येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










