
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून आज शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नागेश आईर यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
एबी फॉर्मचे वाटप आणि उमेदवारी जाहीर- नागेश आईर यांना कालच शिंदे शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पक्षाचा 'एबी फॉर्म' देखील सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या उमेदवारीमुळे वेताळबांबर्डे मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
जनसंपर्काची मोठी शिदोरी- नागेश आईर यांचा वेताळबांबर्डे मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना ही संधी दिली आहे. सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.










