ओरोस बु. जिल्हा परिषद मतदारसंघातून सुप्रिया वालावलकर यांचा अर्ज दाखल

महायुतीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 21, 2026 12:40 PM
views 240  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, माजी पंचायत समिती सदस्य सुप्रिया संतोष वालावलकर यांनी आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज कुडाळ तहसीलदार कार्यालयात सादर केला. भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी ओरोस बु. मतदारसंघातून ही उमेदवारी दाखल केली आहे.

लोकसंपर्क आणि कार्याची पावती

सुप्रिया वालावलकर यांचा ओरोस आणि आसपासच्या परिसरात मोठा जनसंपर्क आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी केलेली विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दाखवलेला तत्परता पाहून पक्षाने त्यांना जिल्हा परिषदेसाठी संधी दिली आहे. अर्ज भरताना त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

महायुतीची ताकद आणि विजयाची खात्री

अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुप्रिया वालावलकर म्हणाल्या की, "भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती झाल्याने आमची ताकद द्विगुणीत झाली आहे. गेल्या काही वर्षांत ओरस परिसरात आम्ही जी कामे केली आहेत, त्यावर मतदारांचा पूर्ण विश्वास आहे. महायुती ही निवडणूक निश्चितपणे जिंकेल आणि जिल्हा परिषदेवर आमचाच विजय होईल."