
कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम दिवस आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना हे युती शद्वारे कणकवलीत निवडणुका लढवीत असून या दोन्ही पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता अनेकांना उमेदवारी पासून वंचित रहावे लागले आहे. यातीलच काही इच्छुक उमेदवारांनी बंडाचा झेंडा रोवल्याचे सद्यस्थितीत तरी पाहायला मिळत आहे. यामध्ये बड्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
कणकवली तालुक्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेहमीच नारायण राणे यांना साथ दिली आहे. नारायण राणे वेळोवेळी ज्या ज्या पक्षात होते त्याच पक्षामध्ये कणकवली तालुक्याची पंचायत समिती व त्या अंतर्गत असणारे जिल्हा परिषद मतदार संघ राहिले आहेत. यावेळी सुद्धा कणकवली तालुक्यावर राणेंचाच वरचष्मा राहील असे दिसते आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. यातील काहींनी सद्यस्थितीत तहसील कार्यालय गाठले असून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता या बंडखोरी करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपचे वरिष्ठ नेते कसे रोखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.










