
दोडामार्ग :केर गावात वाघाच्या वावरामुळे ग्रामस्थांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी मंगेश शांताराम देसाई यांच्या गायीचा वाघाने फडशा पाडला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास ओमकार देसाई हे चारचाकीने गावी येत असताना भर रस्त्यावर वाघ दृष्टीस पडल्याची घटना घडली.
ग्रामस्थांचा रात्री उशिरापर्यंत दुचाकीवरून ये-जा असते. त्यामुळे सर्वत्र दहशतीचे सावट आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी याबाबत वनविभागाला कळवले असून वनअधिकाऱ्यांनी तातडीने कर्मचारी पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. तरी भयमुक्त वातावरण निर्माण करून सुरक्षितता द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
दरम्यान, केर परिसरातील वाघ हा मूळ जंगलातील आहे की वनविभागाने अन्य ठिकाणहुन आणून सोडला, याबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केला असून स्थानीकांत संभ्रम निर्माण झाला आहे. वाघाचा वावर अत्यंत आक्रमक स्वरूपाचा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर मुख्य रस्त्यावर वाघाच दर्शन झाल्याने ग्रामस्थ हादरून गेले आहेत. वनविभागाने तातडीने परिस्थितीवर नियंत्रण आणावे व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.