'स्कायमेट - रिलायन्स इन्शुरन्स'कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचा आरोप
Edited by: दिपेश परब
Published on: July 23, 2024 13:02 PM
views 175  views

वेंगुर्ला : पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत यावर्षी फळपीक विम्याचा हवामानातील चढ-उतार दाखवणारा स्कायमेट कंपनीचा डाटा कृषी विभागाकडून प्राप्त झाला. त्याचा अभ्यास करता स्कायमेट आणि रिलायन्स इन्शुरन्स कंपनी यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना व तालुक्यातील काही आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी करत याबाबत वेंगुर्ला तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    या निवेदनात असे म्हटले आहे की, पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत यावर्षी २५ एप्रिल ते १५ मे पर्यंत सतत तापमान ३८ अंशाच्या वर होतं. मात्र स्कायमेट या कंपनीने कृषी विभागाच्या दिलेल्या डाटा मध्ये तसे दिसत नाही. सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग, वैभववाडी या ठिकाणी सलग पंधरा दिवस तापमान ३८ अंशाच्या वर तर वेंगुर्ला, मालवण, देवगड हे आंबा बागायतींचे पट्टे आहेत तिथे मात्र ३८ अंशाच्या खाली तापमान दाखवत आहे. 

    दरम्यान वेंगुर्ला, मालवण, देवगड येथील जास्तीत जास्त आंबा बागायतदार पिक विमा भरतात. स्कायमेट कंपनी आणि रिलायन्स कंपनी यांच्या संगनमताने या तिन्ही तालुक्यातील तापमानवाढ हेतू पुरस्कर शेतकऱ्याला पैसे मिळू नये यासाठी बनवाबनवी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एकीकडे शेतकऱ्याला १५ मे जोखीम कालावधी संपून सुद्धा नुकसान भरपाई ४५ दिवसात मिळणे अपेक्षित आहे. ती सुद्धा वेळेवर मिळत नाही, म्हणजेच यामध्ये शेतकऱ्यांची गळजेपी होत आहे. यामुळे जर १५ ऑगस्ट पूर्वी या मागण्यांचा निर्णय न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आंदोलन छेडावे लागेल असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना व आंबा बागायतदार शेतकरी यांनी निवेदनाद्वारे वेंगुर्ला तहसीलदार व वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

    दरम्यान वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी व तालुका कृषी विभाग मंडळ अधिकारी हर्षा गुंड यांनी हे निवेदन स्वीकारले.  यावेळी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय, पं. स. माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे, पराग सावंत, आंबा बागायतदार शेतकरी हरिश्चंद्र तांडेल, अर्जुन नाईक, प्रवीण नाईक, महेश परब, शंकर घारे, रामचंद्र आरावंदेकर, सुरेंद्र परब, सुनील परब, राजन आरोस्कर, घनश्याम शेटकर, सोमा परब, निलेश नाईक, नाना गावडे, दादा सावळ, विजय सरमळकर यांच्यासहित इतर शेतकरी उपस्थित होते.