
दोडामार्ग : तिलारी राम घाटात अपघात सत्र सुरूच असून सातारा ते गोवा अशी गोविंद कंपनीच्या दुग्धजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या मिनी टँकरला ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. घाटात अपघातग्रस्त स्पॉट म्हणून ओळखल्या जाणऱ्या जयकर पॉइंट येथील मोठ्या वळणावर ब्रेक फेल झाल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. सुदैवानं संरक्षक कठड्याला हा टँकर अडकल्याने मोठ्या दरीत कोसळण्यापासून वाचला अन मोठा अनर्थ टळला.
अपघाताबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी सातार हुन तिलारी घाटमार्गे गोवा अशी गोविंद कंपनीच्या दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या मिनी टँकर (एम एच ११ डी डी ७४७५ ) तिलारी घाटातुन खाली उतरत होता. मात्र ब्रेक फेल झाल्याने गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यांनतर रस्त्यालगत असणाऱ्या संरक्षक कठड्याला तो टँकर धडकला व अपघात झाला. अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचे व केबिनचे मोठे नुकसान झाले. तर चालक व सहकारी यांना हातापायांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात जखमी झालेले चालक अनिल शिगरे, सहकारी विकास तुळेकर ( राहणार. फलटण जिल्हा सातारा) अशी नावे आहेत.
संरक्षक कठड्याने वाचवले जीव
तिलारी घाटात जयकर पॉईंट हा अपघाताचे प्रमुख केंद्र बनला आहे. येथे मागील काही अपघातांच्या घटना पाहून अपघात टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक मालक यांच्या पाठपुराव्यातून अखेर चंदगड बांधकाम विभागाने या ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या मोठ्या भिंती, कठडे उभारले आहेत. त्यामुळे जीवावर बेतणारे, मोठे अपघात आता टळत आहेत. किंबहुना या संरक्षक कठड्यामुळे माणसांचे तरी जीव वाचणे शक्य झाले आहे.
अवजड वाहनांसाठी घाट रस्ता धोकादायक तरीही..
वेडीवाकडी वळणे, अरुंद घाट, तीव्र उतार, मोठे चढ़ाव यामुळे मोठ्या व अवजड वाहनांसाठी तीलारीचा हा घाट अत्यंत धोकादायक म्हणून परिचित आहे. मात्र शॉर्टकट मारण्याच्या नादात अनेक जण आपल्या जिवितासी शॉर्टकट खेळ करत आहेत. खरं तर या घाटातून अवजड वाहनांची वाहतूक पूर्वी केली जात नव्हती. मात्र हा घाट रस्ता दुरुस्ती केल्याने गोवा ते कोल्हापूर बेळगाव हे अंतर या घाटमार्गाने जवळचे असल्याने या घाटाला अनेक जण प्राधान्य देतात. मात्र इथला अनोळखी मार्ग, अवघड वळणे यामुळें हा घाट अवजड वाहनांसाठी नेहमीच धोकादायक घाट आहे, त्यामुळे वाहन चलकानीचं इथून अवजड वाहतूक टळली पाहिजे.