
कणकवली : दोडामार्ग पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या वीजघर चेकपोस्ट येथे पोलीस कर्मचारी परशुराम सावंत हे बकरा सदृश्य असलेले मांस वाहतूक करणारी स्विफ्ट कार घेऊन पोलीस स्टेशन येथे जात होते. यावेळी ही गाडी अडवून ५० ते ६० लोकांच्या जमावाने गाडी फोडत आतील मांस रस्त्यावर फेकले. यावेळी स्विप्ट चालक निजामुद्दीन कुरेशी व पोलीस कर्मचारी श्री. सावंत याला मारहाण करत गाडी पेटवून दिल्याप्रकरणी अटकेत असल्या सीताराम उर्फ राज तांबे, महेश धर्णे व कलैया हिरेमठ यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक १ श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपींच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
२५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ वा.च्या सुमारास बेळगाव येथून गोवा पासिंगची स्विफ्ट कार वीजघर चेक पोस्टवर आली. यावेळी गाडीमध्ये सुमारे २८० किलो कातडी सोललेले मांस दिसून आले. हे वाहन चौकशी करिता दोडामार्ग पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना पाताळेश्वर मंदिराजवळ ५० ते ६० लोकांच्या जमावाने त्यांची कार अडविली. त्यातील मांस बाहेर फेकून स्विप्टचालक कुरेशी आणि पोलीस कर्मचारी परशुमार सावंत यांना जबर मारहाण केली. त्यानंतर जमावाने सदरचे वाहन पेट्रोल टाकून पेटवून दिले.
याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्याला पोलीस कर्मचारी श्री. सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यासह ६० जणांवर शासकीय कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव व हल्ला करणे तसेच मृत्यू येईल अशी मारहाण करणे, जबर दुखापत करणे, स्फोटक सदृश्य वस्तूचा बेकायदेशीर वापर करणे, आग लावणे, दंगल करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच १६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते.
दरम्यान, यापैकी सिताराम तांबे, महेश धर्णे व कलैया हिरेमठ यांच्यावतीने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर करताना सरकारी पुराव्यात ढवळढवळ करू नये, फिर्यादीं व पिडीतांशी संपर्क साधू नये, असा गुन्हा पुन्हा करू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत.