
सावंतवाडी : राणेंकडून माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्याचे काम गेल्या पाच दिवसापासून सुरू आहे. मात्र, या असल्या दादागिरीला येथील जनता आता घाबरणार नसून निश्चितच धडा शिकवणार आहे. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून अशामुळे वातावरण खराब होत असल्यास त्याला सर्वस्वीं जबाबदार राणे राहतील असा इशारा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी दिला. तर दीपक केसरकर हे तक्रार करून अशा प्रकारचा दहशतवाद या मतदारसंघात आणत असून कार्यकर्त्यांनी डगमगून जाऊ नये मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचेही श्री म्हणाले.
ते म्हणाले, सावंतवाडीतील माझ्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच आता माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना जिल्हा सोडून जाण्याच्या धमक्या येत आहेत. ज्या केसरकारांकडून राणेंना वाईटसाईट बोलल गेलं त्यांच्यासाठी राणे हे सर्व करत असतील ते कितपत योग्य आहे ? याचा विचार येथील जनतेने करावा. मुळात तुम्ही कितीही दादागिरी किंवा धमक्या दिल्या तरी कार्यकर्त्यांच्या मनावर दादागिरी कधीच करू शकत नाही. केसरकरांना याआधी राणे कुटुंबीयांचा दहशतवाद या ठिकाणी दिसत होता तोच दहशतवाद आता आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत असताना दिसत नाही का? मुळात ही दादागिरी आणि हा दहशतवाद केसरकर यांनीच तक्रार करून सावंतवाडीमध्ये आणला आहे असं ते म्हणाले. तर दारोदारी फिरण्याची वेळ का आली याचा विचार तुम्ही करा. इथले प्रश्न जनतेची कामे केली असती तर ही वेळ तुमच्यावर आली नसती. त्यामुळे मतदान करत असताना येथील जनतेने अशा धमक्यांचा आणि दहशतवादाचा जरूर विचार करावा. सावंतवाडीमध्ये असला दहशतवाद कधीच चालत नाही. इथली जनता सुसंस्कृत असून पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठी उभी राहणार आहे. शिवाय कुठल्याही कार्यकर्त्याने डगमगून जाऊ नये, माझे काही झाले तरी चालेल मी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे शेवटपर्यंत खंबीरपणे राहणार आहे.
यावेळी बबन साळगावकर म्हणाले, केसरकर हे नेहमी प्रेमाने निवडणूक जिंकण्याचे आवाहन जनतेला करत होते. परंतु, आज दहशतवाद निर्माण करून ते निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी असले धमकावण्याचे प्रकार बंद करावेत असे आवाहन केले. तर ज्यांनी राणेंना नरकासुर म्हणून उल्लेखले होते तेच आज त्यांना मिठी मारत आहेत अशी टीका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली. तर केसरकर आणि राणेंच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचे माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अँड. दिलीप नार्वेकर, रमेश गावकर आदी उपस्थित होते.