दिल्लीत असलो तरी पूर्ण लक्ष जिल्ह्यावर : नारायण राणे

Edited by: विनायक गावस
Published on: April 04, 2024 15:35 PM
views 317  views

सावंतवाडी : माझ्या खात्याच्या माध्यमातून ओरोस येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे त्याच भुमिपूजन झालं असून लवकरच त्याच काम पुर्ण होईल. या ठिकाणी विविध यंत्रसामुग्रींबाबत व प्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात नवं उद्योजक तयार होत आहेत. तसेच दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे देशातील पहिला मेडिसिन इक्विपमेंट तयार करणारा कारखाना येणार आहे. पाचशेहून अधिक उद्योग आणण्याचा मानस आहे. ओरोस येथे प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना याच ठिकाणी रोजगार मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. सावंतवाडी येथे पत्रकारांशी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.

ते म्हणाले,  गोवा, सिक्किम, तमिळणाडूच दरडोई उत्पन्नात आपल्यापेक्षा पुढे आहे. मी केंद्रात असलो तरी माझं पूर्ण लक्ष जिल्हावर आहे. ३५ वर्षांपूर्वी या जिल्ह्याच दरडोई उत्पन्न ४० हजार होत. आज ते २ लाख ४० हजार आहे‌. येत्या काळात ते साडेतीन लाखांपर्यंत पोहचवायचे आहे. केंद्रात मंत्री असलो तरी जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे.विरोधकांनी केवळ माझ्यावर टीका करण्याच काम केलं. साधी बालवाडी सुद्धा सुरू केली नाही. या उलट इंजीनियरिंग कॉलेज, मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल मी या जिल्ह्यात आणलं. कोकणी माणसाचा फायदा झाला पाहिजे त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हाच दृष्टिकोन माझा कायम राहीला आहे‌. जिल्ह्यातील लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अडीचशे कोटींच अद्ययावत मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल सुरु केलं. कोरोनात अनेक रूग्णांवर मोफत औषधोपचार केले. अमेरीका आणि जर्मनीच्या मशीनरीस या रूग्णालयात उपलब्ध आहेत. येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था तेथील स्वच्छता गृह एकदा मुद्दाम जाऊन पहा. येथे देखिल चांगल्या सुविधा देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या काळात ही परिस्थिती बदण्याच काम केलं.

दरम्यान, माझ्या प्रकृतीवरून विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत. माझ्या संयमाची पण एक लक्ष्मण रेषा ठरलेली आहे. तर माझी प्रकृती ठणठणीत आहे. विरोधकांनी त्याची काळजी करू नये. दिवसातून १८ तास मी काम करतो. नियमीत वाचन करतो. जगभरातील विविध महान लोकांची आत्मचरित्र वाचण हा माझा छंद आहे. विकासाच्या विषयावरील वाचन नियमीत करतो. अर्थशास्त्राचा अभ्यास हा माझा आवडता विषय आहे. माझी अनेक पुस्तकही प्रसिद्ध झाली आहेत. महाराष्ट्रातील कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून आजही माझ कौतुक होत. विरोधात बोलणाऱ्यांनी एक दिवस माझ्यासोबत राहून काम करून दाखवावे असे आव्हान मंत्री राणेंनी दिलं.

माझा जन्म वरवडे सारख्या दुर्गम भागातील सर्वसामन्य कुटुंबात झाला. आजवर संघर्ष करून मी पोहचलो आहे.नगरसेवक,बीएसटी चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, विधानसभा आमदार, राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री पद आजवर मी भुषविले. कोणतही पद मागितलं नाही. मेरीटवर पद मिळविली. व्यवसायात देखील मी कष्टातून पुढे आलो आहे. कुणाचही घर पेटविण्याचा वाईट विचार केला नाही. ज्यांनी माझं घर जाळलं त्यांची केला नाही. दुश्मनी ठेवली नाही. यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. तर विकास करताना नुसती दृष्टी असून चालत नाही तर डोळसपणा लागतो असंही ते म्हणाले.

जग फार मोठं आहे. सर्व ज्ञान आत्मसात करणं कठीण आहे. मात्र, मला जेवढं शक्य होईल तेवढं नेहमीच आत्मसात करतो. मिळालेल्या ज्ञानाचा व पदाचा उपयोग जिल्हातील लोकांसाठी कसा करता येईल याचा प्रयत्न असतो. केवळ पैशानेच आनंद मिळतो असं नाही. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मिळणारा आनंद शब्दांत न सांगता येणारा आहे अस मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत संवाद साधला. याप्रसंगी भाजपचे नेते दत्ता सामंत, मनिष दळवी, संजू परब, महेश सारंग, विशाल परब, श्वेता कोरगावकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.