
कणकवली : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघांच्या निवडणूकीत मतदानासाठी उमेदवारांनी पैसे वाटण्याचा प्रकार करून मतदारांना नासवण्याचा प्रकार केला. सत्ताधारी असतील अथवा विरोधी उमेदवारांकडून लोकसभेसाठी पैसे वाटण्याची ही पहिलीच घटना असावी.मात्र, मतदार सुज्ञ असून यावेळी अनपेक्षित निकाल येईल, असे सांगतानाच ज्यांनी पैसे घेतलेले आहेत, त्यांनी २०१४ चा इतिहास पहावा असा उपरोधिक टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले,यावेळी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात विकास कामांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आज जिल्हयातील रस्ते, राष्ट्रीय महामार्गाची काय स्थिती आहे? पालकमंत्री निवडणूक प्रचारात जिल्हयात फिरलेही नाहीत. या लोकसभा मतदारसंघांचा इतिहास पाहता नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू यांची परंपरा आह परंतु यावेळी निवडणुकीत आपण काय केले किंवा काय करणार हे सांगण्यापेक्षा मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार अधिक घडला. सत्ताधारी असतील अथवा विरोधी उमेदवारांकडून लोकसभेसाठी पैसे वाटण्याची ही पहिलीच घटना असावी. यापुर्वी काही शहरांमध्ये नगरपंचायतीच्या निवडणूकांना वस्तु वाटल्याची उदाहरणे होती. परंतु आतापर्यंत असा प्रकार घडलेला नव्हता. ज्यांनी पैसे घेतलेले आहेत, त्यांनी २०१४ चा इतिहास पहावा, असेही परशुराम उपरकर म्हणाले
या निवडणूकीत कोणत्याही उमेदवाराने मतदानानंतर मतदारांचे आभार मानलेले नाहीत. येथील मतदार सुज्ञ आहेत. त्यामुळे यावेळी अनपेक्षीत निकाल येऊ शकतो, त्यामुळे कुणीही पैजा लावताना दिसत नाहीत. याचाच अर्थ विजयाबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, असेही श्री. उपरकर म्हणाले, जिल्यातील विकास कामांबाबत सध्या काय स्थिती आहे. अनेक रस्त्यांची कामे मंजूर झालेली असली तरीही पैसे आलेले नाहीत. पालकमंत्री जिल्हयात प्रचाराला आलेले नाहीत, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून काय करणार? हे सांगितले गेले नाही, सत्ताधारी मंत्री असूनही काय काम झाले हे सांगू शकलेले नाहीत. काही महिन्यांपुर्वी केंद्रीय उद्योग मंत्र्यांच्या रोजगार मेळाव्यात कमी उपस्थिती वरून डबलबारीला गर्दी होती पण मेळाव्याला नाही, असे सांगितले जात असेल तर असे मेळावे, कसे चुकीचे व लोकांना फायद्याचे नव्हते हे दिसून येत असल्याचेही परशुराम उपरकर म्हणाले.मुळात सत्ताधारी आणि विरोधकांनी विकासाच्या प्रश्नावर निवडणुक लढविण्यापेक्षा मतदारांना गृहीत धरून लढणे पसंत केले त्यामुळे जनता अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही ते म्हणाले.