
दोडामार्ग : दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षांच्या कालखंडात जनतेला खोटी आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर विकासाची भूमिपूजने करून जनतेला फसवीणाऱ्याला धडा शिकवलाच पाहिजे म्हणून बदल हवा तर आमदार नवा या हेतूने कामाला लागा विजय आपला निश्चित आहे. असे राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
दोडामार्ग येथील शिवसेना कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील जनतेला दिलेले कोणते आश्वासन दीपक केसरकर यांनी पूर्ण केले? अम्युझमेंट पार्क, जलपार्क, आडाळी एमआयडीसी या मुद्द्यावरून त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सहित भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांचे एकच मिशन आहे. तो म्हणजे गिरगिटाप्रमाणे रंग बदलणाऱ्या दीपक केसरकर यांचा परफेक्ट कार्यक्रम करायचा आहे व त्यांना या निवडणुकीत कायमचे घरी बसवायचे आहे असे ते म्हणाले यावेळी त्यांच्या सोबत सावंतवाडी मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस, युवासेना तालुका प्रमुख मदन राणे, कसई-दोडामार्ग नगरसेवक चंदन गावकर, संदेश राणे, संदेश वरक, विष्णू मुंज, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. तेली म्हणाले, दोडामार्गातील जनतेने दीपक केसरकर यांना भरभरून प्रेम दिले. मात्र दीपक केसरकर यांनी येथील जनतेला केवळ फसवण्याचे काम केले. तालुक्यातील सर्व गावांना ना पाणी दिले, ना रोजगार दिला, ना ॲम्युझमेनट पार्क, ना आडाळी एमआयडीसी, ना चांगली आरोग्य व्यवस्था, ना पर्यटन दिले.
काजू उत्पादक शेतकऱ्यांना लोकसभेपूर्वी काजूचे अनुदान देण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र सहा महिन्याचा कालावधी उलटूनही तो प्रश्न अजूनही तसाच प्रलंबित आहे. वन्य प्राण्यांपासून शेतकरी बाधित झाला आहे, त्यांनाही दीपक केसरकर न्याय देऊ शकले नाही. येथील जनतेच्या प्राथमिक गरजा ज्या व्यक्तीने पंधरा वर्षात दिल्या नाहीत, ती व्यक्ती यापुढे काय देणार? त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका व त्यांना या निवडणुकीनंतर कायमचे घरी पाठवुया असे आवाहन राजन तेली यांनी केले.