असं आहे मालवण न. प. चं गणेशोत्सवासाठी नियोजन

नियोजन सभेकडे माजी नगरसेवकांनी फिरवली पाठ
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 08, 2023 17:31 PM
views 138  views

मालवण : गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील नियोजनाबाबत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नगरपरिषदेत आयोजित केलेल्या नियोजन बैठकीकडे सर्व माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली. काही व्यापारी, अधिकारी यांच्या उपास्थितीत घेण्यात आलेली बैठक नियोजन सांगून अर्ध्या तासात आटोपती घेण्यात आली. 


गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी चतुर्थीच्या दहा ते पंधरा दिवस आधी नगरपरिषदेत नियोजन बैठक घेण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगरपरिषद सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे,   यासह सर्व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, रिक्षा संघटना प्रतिनिधी, यासह व्यापारी उपस्थित होते.


शहरातील रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. काही ठराविक रस्ते सोडल्यास रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.  हायमास्ट दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले असून हायमस्ट सुरु झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याचे काम सुरु आहे. विसर्जन स्थळी लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 22 विसर्जन स्थळे असून त्याठिकाणी लाईट पुरविण्याचे काम देण्यात आले आहे अशी माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली आहे.


अशी असेल पार्किंग व्यवस्था : 

यावेळी करण्यात आलेल्या नियोजनामध्ये सागरी महामार्ग येथे लक्झरी, ट्रक, यासह सर्व प्रकारच्या अवजड गाड्यांसाठी पार्किंग, नाट्यगृह येथे खाजगी गाड्या पार्किंग, टेम्पो, बांगीवाडा येथे सहा आसनी रिक्षा, टेम्पो, सारस्वत बँकेसमोरील रस्त्यावर एका बाजूला दुचाकी पार्किंग, मशीद गल्ली येथे दुचाकी, सायकल पार्किंग, जेटी परिसरात अतिरिक्त रिक्षा पार्किंग, सुबोध मेडिकल ते भाजी मार्केट रस्ता येथे रिक्षा आणि हातगाडी पार्किंग, राणे मेडिकल येथे सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. फक्त सायकल मशीद गल्ली पर्यंत जाऊ शकतात. हॉटेल सागर किनारा येथे रिक्षा थांबा, नेरूरकर गल्ली येथे सर्व वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. सर्व फळ विक्रेते, हातगाडी, फेरीवाले यांची बंदर विभागाच्या नवीन पार्किंग जागेत व्यवस्था करण्यात आली. स्टेट बँक- भरड नाका बाजारपेठ रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंगसाठी मनाई करण्यात आली आहे. येथील वाहनधारकांना भरड येथील नगरपरिषदेचे वाहनतळ मोफत उपलब्ध करून देण्यात आले. भरड नाका येथील बाणावलीकर कंपाउंड चार चाकी वाहणांसाठी पार्किंग. भूमिअभिलेख कार्यालयानजिक असणाऱ्या शासकीय गोडाऊन येथे दुचाकी पार्किंग होणार आहे. गवंडीवाडा 


याठिकाणी असणार पोलीस बंदोबस्त : 

चतुर्थी काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे महत्वाच्या चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीला  होमगार्ड असणार आहेत. सागरी महामार्ग, एसटी स्टॅण्ड, भरड, तारकर्ली नाका, सकपाळ नाका, जेटी नाका, फोवकांडा पिंपळ, जेट्टी नाका, राणे मेडिकल, कोळंब सागरी महामार्ग याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 


रिक्षा व्यवसायिकांनी अवास्तव भाडे आकारू नये : 

गणेश चतुर्थी काळात अनेक चाकरमानी येणार आहेत. रिक्षा व्यवसायिकांनी आपले थांबे सोडू नयेत. दिलेल्या नाक्यांवर आपली रिक्षा लावावी. तसेच अवास्तव भाडे आकारू नये अशा सक्त सूचना पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केल्या आहेत. 


अतिक्रमणांवर होणार कारवाई : 

बंदर जेटी परिसरात बंदर विभाग आणि नगरपरिषद हद्दीत अनेक अतिक्रमणे आहेत. या सर्व अतिरकमणांवर येणाऱ्या काळात मोठी कारवाई होणार आहे. पुढील महिण्यात अनेक व्हीव्हीआयपी मंडळी येणार आहेत. त्या पार्शवभूमीवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी संतोष जिरगे, बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.