
सावंतवाडी : सिंचन वर्ष 2025-2026 च्या रब्बी हंगामासाठी पाणी नियोजन व पीक नियोजन करणेसाठी जलसंपदा विभागामार्फत शेतकरी व पाणी वापर संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध जलसाठा, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची गरज व इतर प्राधान्यक्रम लक्षात घेता रब्बी हंगामात पाण्याचा न्याय्य, कार्यक्षम व नियोजनबद्ध वापर करणे अत्यावश्यक आहे.
त्या अनुषंगाने संबंधित पाणी वापर संस्था, शेतकरी बांधव व लाभार्थी यांनी आपल्या क्षेत्रातील प्रस्तावित पिकांचा तपशील, लागवड क्षेत्र, व कालावधी याबाबत अपेक्षित पाण्याची मागणी अर्ज लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. सदर पाणी मागणी अर्ज जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत.तसेच, जलसंपदा विभागाने/प्राधिकरणाने मंजूर केलेल्या पाणी नियोजनाच्या व्यतरीक्त/विरुद्ध पाणी उपसा किंवा अनधिकृत पाणी वापर केल्यास महाराष्ट्र सिंचन अधिनियम, 1976 व इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, याची जाणीव करून देण्यात येत आहे.
रब्बी हंगामातील पाण्याचा समन्यायी वाटप,योग्य व शाश्वत वापर व पाण्याचे पाळ्या सुरळित होण्यासाठी सर्व संबंधितांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, आंबडपाल, कुडाळ व पालपाटबंधारे उपविभाग सावंतवाडी मार्फत करण्यात आले आहे.










