लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे यशस्वी बांधकाम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 03, 2026 19:40 PM
views 121  views

देवगड : ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 शाखा देवगड व पंचायत समिती देवगड यांचा संयुक्त पुढाकाराने व लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन व जलसंधारणाच्या दृष्टीने वनराई बंधारे बांधणेचा उपक्रम आदर्श ठरतो,असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यातील वाघिवरे–वेळगिवे गावात लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

पाणी साठवणूक वाढविणे व भूजल पातळी उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून हे काम ग्रामपंचायत अधिकारी संघटना देवगड, पंचायत समिती देवगड व ग्रामपंचायत वाघिवरे–वेळगिवे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले. बंधाऱ्याच्या कामानंतर निसर्गरम्य वातावरणात आढावा बैठकही घेण्यात आली. दैनंदिन प्रशासनाच्या धावपळीतून थोडा विरंगुळा मिळाला, तसेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आजचा दिवस सर्वांसाठी खास ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या वनराई बंधाऱ्यामुळे ओहोळातून वाहत जाणारे पाणी अडवून त्याचा योग्य साठा होणार आहे व परिसरातील  भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. परिणामी शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उपक्रमात वाघिवरे–वेळगिवेचे सरपंच राजन लाड, सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील, उपसरपंच सहदेव लाड, माजी सरपंच संतोष चव्हाण, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, विस्तार अधिकारी (कृषी) अभिजित मदने, विस्तार अधिकारी (ग्रापं) दीपक तेंडुलकर व तुषार हळदणकर, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, विस्तार अधिकारी (आरोग्य) गंगुताई अडुळकर, वरिष्ठ सहाय्यक स्वप्नजा बिर्जे, ग्रामपंचायत अधिकारी वाघिवरे वेळगिवे उमर मुल्लाणी, तालुका संघटना सचिव श्रद्धा आळवे, जिल्हा संघटक उज्वल झरकर आदी मान्यवर उपस्थित राहत मार्गदर्शन केले तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी , ग्रा.प सदस्य , अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी श्रमदान करून उपक्रमाला हातभार लावला .