
दोडामार्ग : कुडासे येथील विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी लहानपणापासूनच ध्येय निश्चित करून परिश्रमपूर्वक वाटचाल केली पाहिजे. भरपूर ज्ञान, आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी या गुणांच्या जोरावरच यश प्राप्त करता येते. स्वतःमधील गुण ओळखून योग्य दिशेने प्रयत्न केल्यास जीवनात नक्कीच यश मिळते, असे प्रतिपादन उद्योजक प्रभाकर सडेकर यांनी केले.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज (सायन्स), कुडासे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग येथील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून प्रभाकर सडेकर बोलत होते.
यावेळी डॉ. प्रविण देसाई यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद करताना सांगितले की, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासातून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देते. यश मिळाले नाही तरी त्या प्रक्रियेतून विद्यार्थी समाजासाठी उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो, मग तो व्यापारी असो, उद्योजक असो किंवा शेतकरी. त्यामुळे स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
प्रमुख अतिथी रविंद्र भागवत सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद मला प्रेरणा देणारा आहे. छोट्या-छोट्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जिद्द व मेहनतीने यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे यश केवळ सुरुवात असून, भविष्यात अजून अनेक शिखरे तुम्हाला गाठायची आहेत. शिक्षणासोबतच कला व क्रीडा क्षेत्रातही तुम्ही उज्ज्वल कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय खेळाडू सुचित्रा गोंधळी व रावी देसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच यावर्षीच्या आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कारासाठी अनुक्रमे कु. विघ्नेश धुरी व कु. अनुष्का म्हापसेकर यांची निवड करण्यात आली.
प्रशालेचे मुख्याध्यापक जे. बी. शेंडगे सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमास कुडासेच्या सरपंच नम्रता देसाई, उपसरपंच प्रसाद कुडासकर, संस्थेचे समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक, शालेय समिती सदस्य प्रकाश कुडासकर, बाबाजी देसाई, उदय गवस, रामदास मेस्री, पूजा देसाई, संदेश तळणकर, दत्तप्रसाद देसाई, सुनिल गवस, राजाराम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिपाली पालव व सागर डेगवेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन पी. बी. किल्लेदार सर यांनी मानले.










