
सावंतवाडी : चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड किल्ला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. ४ (म्हाराठी) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. ५ नेनेवाडी या शाळांचे एकत्रित वनभोजन उत्साहात पार पडले.
या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना केवळ निसर्गसौंदर्याचाच नव्हे तर इतिहासाचाही प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या वनभोजनात नेनेवाडी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. चंद्रकांत सावंत, म्हाराठी शाळेचे मुख्याध्यापक जावेद तांबोळी, शिक्षक राहुल वागदरे यांच्यासह दोन्ही शाळांचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किल्ल्यावर असलेल्या विविध मंदिरे, तटबंदी, बुरुज व स्मारकांची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवत समजावून सांगितली.
पारगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, त्यामागील स्थापत्यकला व सांस्कृतिक महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. प्रत्येक मंदिर व स्मारकाची वैशिष्ट्ये समजून घेताना विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. अभ्यासाबरोबरच अशा शैक्षणिक सहली ज्ञानवृद्धीसाठी महत्त्वाच्या ठरतात, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या इतिहासविषयक जाणिवा अधिक प्रगल्भ होत असून ‘अनुभवातून शिक्षण’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याचे चित्र या वनभोजनातून दिसून आले.










