
मालवण : वेगवेगळ्या आमिषांना भुलून काहीजण सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. मात्र निष्ठावंत शिवसैनिक अजूनही आमच्या पाठीशी आहेत हे आजच्या उपस्थिती वरून दिसून येते. सध्याच्या आमदार, खासदारांनी आपले मॅनेजर नेमले असून त्या मॅनेजरांकडून लोकांना खोटी आश्वासने, आमिषे देऊन प्रवेश घेतले जात आहेत. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. पोईप गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाली. यावेळी वैभव नाईक यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोईप उपविभागप्रमुख पदी समीर लाड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वैभव नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.
वैभव नाईक पुढे म्हणाले, निवडणुकीत मतदानासाठी लाडकी बहिण योजना आणून सरसकटपणे सर्व महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र आता वेगवेगळे निकष लावून लाखो महिलांची नावे या योजनेतून कमी करण्यात आली आहेत. चांदा ते बांदा योजना बंद, आनंदाचा शिधा योजना बंद, १ रुपयात पीक विमा योजना बंद, विविध योजनांसाठी दूत नेमण्याची योजना बंद करण्यात आली आहे. दिवाळीत अंत्योदय शिधा पत्रिका धारकांना साडी वाटप आता होणार नाही. विविध विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त बोनसचे वाटप केले जात होते तेही बंद केले आहे. त्यामुळे 'योजना बंद करणारे हे सरकार आहे. अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.
आमदार, खासदार मात्र जनतेच्या समस्या जाणून घेताना दिसत नाहीत. आज कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते पूर्णतः खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झाले आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कुडाळ मालवण मध्ये एकही काम पूर्ण झाले नाही. सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत. योजना बंद केल्या जात आहेत, दाखले वेळेवर मिळत नाहीत अशा विविध समस्यांनी जनता त्रस्त असून लोकांच्या मूलभूत गरजा देखील हे सत्ताधारी पूर्ण करू शकत नाहीत अशीही टिका वैभव नाईक यांनी केली.
यावेळी पोईप येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, विभागप्रमुख विजय पालव, पोईप सोसायटी चेअरमन विठ्ठल नाईक, राहुल सावंत, ऐवान फर्नांडिस, नाना नेरुरकर, शाखाप्रमुख अनिल येरम, शाखाप्रमुख बाळा सांडव, राजू नाडकर्णी, रुपेश वर्दम, भूषण नाईक, बबलू वेंगुर्लेकर, नितीन पालव, निलेश परब, रामचंद्र घाडीगावकर, दीपक मसदेकर, किरण गावडे, संदीप ठाकूर, मालोजी रासम, राजेंद्र पालव, राजाराम पोईपकर, राजू डिचवलकर, अभिजित वाडकर, अरुण माधव, रामचंद्र तावडे, दिनकर पालव, प्रकाश माधव, पुनेश जाधव, वंदन नाईक, गणेश सांडव, सुनील पोईपकर, सागर सांडव, साहिल सांडव, अमोल सांडव, प्रसाद जाधव, संतोष वेंगुर्लेकर, आबा परब, बाबू घाडीगावकर, सचिन पोईपकर, अनिल तोंडवळकर,प्रकाश घाडीगावकर, ज्ञानेश्वर वाडकर,गणेश नेरुरकर, विठ्ठल नाईक, श्रीधर माधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.