
कुडाळ : पिंगुळी येथील म्हापसेकर तिठा येथे असलेल्या संजना कलेक्शन या कपडे विक्रीच्या दुकानातून सुमारे ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या छपराचे पत्रे तोडून आत प्रवेश करत ही चोरी केली. या प्रकरणी दुकानमालक आरती संजय परब यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पिंगुळी देऊळवाडी येथील आरती परब यांचे म्हापसेकर तिठा येथे 'संजना कलेक्शन' नावाचे कपडे विक्रीचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या छपराचे सिमेंटचे पत्रे तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानामधील ब्युटी पार्लरमधील विविध प्रकारचे साहित्य चोरून नेल्याचे परब यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. चोरीला गेलेल्या साहित्याची अंदाजित किंमत ३७ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.