साटेली भेडशीतील 'ते' ते घर पावसामुळे जमीनदोस्त

Edited by: लवू परब
Published on: July 26, 2024 10:39 AM
views 150  views

दोडामार्ग : सर्व सामान्य नागरिकांना आवश्यक गरजेच्या असलेल्या समस्या याकडे प्रशासकीय विभाग  कडून वेळोवेळी अन्याय केला जातो.  साटेली भेडशी येथील चंद्रावती दत्ताराम नाईक, संतोष नाईक राहत असलेले जूने घर जीर्ण  होत आले. ते त्या ठिकाणी पंतप्रधान आवास घरकुल योजना मधून बांधकाम करण्यासाठी साटेली भेडशी ग्रा. पं. कडून दोडामार्ग पंचायत समिती मध्ये प्रस्ताव सादर करून देखील तो मंजूर केला नाही. यामुळे घर बांधकाम करता आले नाही. आणि काही भाग भिंत कोसळलेले घर आता जमीनदोस्त  होऊन कुटुंब बेघर झाले आहे. प्रशासनाने प्रस्ताव मंजूर केला असता तर ही वेळ आली नसती. दोडामार्ग तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन खास बाब म्हणून प्रस्ताव मंजूर करून बेघर कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे. 

दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे  झालेल्या मुसळधार पावसामुळे साटेली भेडशी  येथील रहिवासी चंद्रावती दत्ताराम नाईक, संतोष दत्ताराम नाईक, राहत असलेल्या जुन्या घराचे छप्पर व भिंत गेल्या आठवड्यात  पडून नुकसान झाले होते. या बाबत दोडामार्ग महसूल विभाग कडून पंचनामा देखील केला होता. असे असताना गुरूवारी राञी पासून पडत असलेल्या वादळी पावसामुळे शुक्रवारी पहाटे घर जमीनदोस्त झाले. घरातील मंडळी घराला लागून पलीकडे असलेल्या खोलीत गेल्याने थोडक्यात वाचल्या पण घराचे मोठे नुकसान झाले आहे. घर जमीनदोस्त झाल्याने कुटुंब बेघर झाले आहे. शासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी  होत आहे. 

साटेली भेडशी येथील चंद्रावती दत्ताराम नाईक यांचा मुलगा संतोष नाईक यांनी या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळावे यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव तीन महिने अगोदर ग्रा. पं. कडून दोडामार्ग पंचायत समिती मध्ये पाठवला होता. निवडणूक आचारसंहिता इतर कारणे सांगितली. पण या कुटुंबाला घराची गरज आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. हे लक्षात घेऊन प्रस्ताव लगेच मंजूर केला असता तर आज ही वेळ आली नसती. 

साटेली भेडशी येथील चंद्रावती दत्ताराम नाईक हिचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन दोडामार्ग तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी पावसाळा संपल्यानंतर घर बांधता आले पाहिजे यासाठी पाठवलेला घरकुल प्रस्ताव तातडीने खास बाब म्हणून मंजूर करून कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.