
सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'महायुती' न होता 'मैत्रीपूर्ण लढत' होईल, असा स्पष्ट निर्णय झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी याच विचाराने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
बंडखोरीला मदत कशाला ?
महायुतीत युती न करण्यामागचे स्पष्ट कारण सांगताना मंत्री राणे म्हणाले, "आम्ही महायुती करून बंडखोरीला कशाला मदत करायची?" महायुती झाल्यास महाविकास आघाडीला तयार उमेदवार मिळतील, त्यामुळे प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढून आपली ताकद दाखवावी, अशी भूमिका त्यांनी घेतली.
'उबाठा'कडे उमेदवार आहेत का ?
महाविकास आघाडीला आव्हान देताना नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला, "कणकवली नगरपंचायतीसाठी किंवा जिल्हा परिषदेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडे उमेदवार आहेत का?" त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने ते महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
"आमच्याकडे लढण्यासाठी ५० सक्षम आणि तयार उमेदवार आहेत," असे सांगत राणे यांनी भाजपची तयारी दर्शविली. ज्यांना कोणाला ताकद दाखवण्याची इच्छा असेल, त्यांनी रिंगणामध्ये ती स्पष्टपणे दाखवावी, असे थेट आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
शिवसेनेच्या (शिंदे गट) एका वरिष्ठ नेत्याने देखील स्वबळावर लढण्याचे वक्तव्य केल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक तालुक्यातील सर्व नेते व कार्यकर्ते आपापल्या कामाला लागले असून, यावेळी महायुती न होता मैत्रीपूर्ण लढत होणार हे निश्चित झाले आहे, असे राणे यांनी नमूद केले.
राजकीय कुरघोडी आणि भांडणांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा जनतेचा विकास करणे हेच आमचे प्रमुख ध्येय असेल, असे स्पष्ट मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.










