मराठा मोर्चावर लाठीचार्ज प्रकरणाची सखोल चौकशी करावी

वेंगुर्ल्यात मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन
Edited by: दिपेश परब
Published on: September 05, 2023 15:15 PM
views 269  views

वेंगुर्ला : जालना येथील मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मात्र या प्रकरणातुन विरोधी पक्षातील विरोधक केवळ राजकारण करण्याचा कुटील प्रयत्न करीत असून जाणीवपुर्वक मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बदनामी करीत आहेत. तसेच गोरगरीब यांना आवश्यक असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणाची ढाल करुन विरोधी पक्षातील नेते तसेच कार्यकर्ते राजकारण करीत आहेत. त्याची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वेंगुर्ला मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन ४ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात देण्यात आले. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी हे निवेदन स्विकारले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील मराठा समाज विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर अनेक मोर्चे निघाले. तरीही मराठा आरक्षणाबाबत शासनाकडून कोणतीही ठाम भूमिका व निर्णय झालेला नसल्याने समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे.

अजूनही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन चालू असतात. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये गेले अनेक दिवस शांततेमध्ये आंदोलन सुरू होते. सदर आंदोलकांवर शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस यंत्रणेमार्फत लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचा आम्ही वेंगुर्ला तालुक्यातील समस्त मराठा समाज निषेध व्यक्त करतो, तसेच शांततेने सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालेल्या या प्रकरणाची शासनाने वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आहोत. तसेच या प्रकरणातून विरोधी पक्षातील विरोधक केवळ राजकारण करण्याचा कुटील प्रयत्न करीत असून जाणीवपूर्वक मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री यांचा बदनामी करण्याचा हेतु पुरस्कर प्रयत्न करीत आहेत. तसेच गोरगरीब यांना आवश्यक असलेल्या मराठा आरक्षण या प्रकरणाची ढाल करून या वरुन विरोधी पक्षातील नेते तसेच कार्यकर्ते हे गोरगरीब जनतेची थट्टा करून याप्रकारणामुळे राजकारण करीत आहेत. ज्याची सखोल चौकशी करून त्यामध्ये सामील असणारे विरोधकांची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे म्हटले आहे. 

यावेळी मराठा समाजाचे प्रसन्ना प्रितेश राऊळ, रामसिंग राणे, देसाई, रामकृष्ण सावंत, बिटू गावडे, उदय गावडे, सुनिल धाग, संतोष गावडे, किशोर परब, दिलीप परब, नारायण गावडे, सत्यविजय  गावडे, श्रीकृष्ण परब, मयुरेश शिरोडकर, महादेव गावडे, राहुल गावडे, दयानंद येरेम, बालकृष्ण येरम, नारायण गावडे, समिर गोसावी, निलेश गवस, विष्णू परब, बंड्या पाटील, शीतल आंगचेकर- खानोलकर, प्रीतम सावंत, विजय नाईक, संतोष शेटकर, सुजाता देसाई, यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.