
सावंतवाडी : निगुडे येथे ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटच्या लाइनचे काम करत असताना शॉक लागून जखमी झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला महावितरणकरून साधी विचारपूस सुद्धा केली नाही. विजेचा धक्का लागून दोन दिवस झाले तरी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आणि जखमी कर्मचाऱ्यांचा कंत्राटदार त्याला भेटायला न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कामगार नेते अशोक सावंत व वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष संदीप बांदेकर यांनी इन्सुली येथे घरी जात कुडव यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आम्ही तुमच्या पाठीश आहोत असा धीर देत बेजबाबदार प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली.
बांदा दोनचे कंत्राटी कर्मचारी गुरुनाथ मंगेश कुडव हे कंत्राटी कर्मचारी म्हणून निगुडे येथे कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी वीज वहिनी बंद करून निगुडे गावठणवाडी येथे ते स्ट्रीट लाईटची वायर जोडण्यासाठी खांबावर चढले होते. दरम्यान, काम आटोपून खाली उतरत असताना त्यांना अचानक लाइन सुरू झाल्याने विजेचा शॉक लागून त्यांचा हात लाईनला चिकटून राहिला. प्रसंगावधान राखत सोबत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वाळलेल्या बांबूच्या साहाय्याने हात बाजूला केला नंतर जखमी अवस्थेत ते खाली उतरले. यावेळी ग्रामस्थांनी तातडीने त्यांना बांदा येथे उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविले. तेथे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत असून ते काही महिने तरी हे काम करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत महावितरणकडून त्यांना तातडीची मदत किंवा अधिक उपचारासाठी खाजगी किंवा चांगल्या दवाखान्यात नेऊन त्यांच्या इतर तपासण्या करणे गरजेचे होते. मात्र हे सर्व सोडाच संबंधित विभागाचे बांदाचे अभियंता वगळता कोणीच त्यांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही. एवढी मोठी घटना घडूनही जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता यांना सुद्धा या घटनेची माहिती कोणीच दिली नाही. माहिती असतानाही ते शुक्रवारी त्यांना पाहण्यासाठी आले नाही . सावंतवाडीचे उप कार्यकारी अभियंता सुद्धा त्यांना पाहण्यासाठी आले नाही. संबंधित कर्मचाऱ्यांचा कंत्राटदार सुद्धा त्यांना पाहण्यासाठी आला नाही. त्यामुळे संबंधित विभागाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधीनि याकडे लक्ष देऊन असे झोपी गेल्याचे सोंग घेणाऱ्या अधिकारी व कंत्राटदार यांना जाब विचारावा अशी मागणी होत आहे.
याबाबतची माहिती लागताच जिल्हा परिषदचे माजी सभापती, नियोजन समिती सदस्य अशोक सावंत व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर यांनी कुडव यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. तर याबाबत कार्यकारी अभियंता यांना फोनद्वारे जाब विचारत आमच्या कर्मचाऱ्यांना असेच वाऱ्यावर सोडणार का तसेच जर तुमचे कंत्राटदार कर्मचाऱ्यांना बघायला सुद्धा येण्याच्या मनस्थितीत नसतील तर आम्ही काय ते बघू असा इशारा त्यांनी त्यांना दिला. यावेळी कुडव यांना धीर देत तुम्ही आरोग्याची काळजी घ्या तब्बेत व्यवस्थित झाल्याशिवाय कामावर हजर होऊ नकोत बाकीचे काय ते आम्ही बघू असे सांगत धीर दिला.