
सावंतवाडी : कारिवडे गावासहीत कोलगाव जि.प. मतदार संघात दीपक केसरकर यांचे स्वंयघोषित व विकृत मनोवृत्तीचे काही कार्यकर्ते युती धर्माला त्रास होईल असे काम करीत असुन येणा-या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणुन केसरकर यांना उमेदवारी दिल्यास सहकार्य न करण्याची भुमिका आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर यांच्यासहित कारिवडे येथील सर्व भाजप पदाधिका-यांनी घेतली आहे.
ते म्हणाले, कारिवडे गावात भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते महेश सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच काम करीत असुन यापुढेही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक निष्ठेने भारतीय जनता पार्टीचे काम करीत राहु. दिपक केसरकर यांचे काही विकृत मनोवृत्तीचे कार्यकर्ते कारिवडे गावात कलह माजवत असुन देवस्थान कमिटी एका राजकीय पक्षाच्या दावणीस बांधल्यागत कारिवडे गावात वावरत आहेत. तसेच महायुती म्हणुन कारिवडे गावाच्या विकासासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सहकार्याने महेश सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या निधीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य करुन लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारिवडे गावातील काही जमिनी या देवस्थानच्या नावे असुन ते उपभोगणा-या काही ग्रामस्थांना त्रास होईल अशी कृत्ये केसरकर यांच्या काही कार्यकर्त्यांकडुन केली जात आहेत. त्यामुळे येणा-या विधानसभा निवडणुकीत केसरकर यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा इशारा आंबोली मंडळ उपाध्यक्ष श्री. अशोक माळकर यांच्यासहीत सर्व कारिवडे येथील भाजप पदाधिका-यांनी दिला आहे.