उंडील इथं नाल्यावरील मोरी खचून वाहतुकीस फटका बसण्याची शक्यता

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 27, 2023 19:31 PM
views 202  views

देवगड : उंडील पिंपळाचामाळ येथील नाल्यावरील मोरी खचल्याने वाहतूकीस मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याबरोबरच वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उंडील ता. देवगड गावात फणसगाव भागातून जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर पिंपळाचामाळ येथील ओहोळावरील मोरी खचल्याने रस्ता वाहतूकीस धोकादायक बनला आहे. उंडील गावातून फणसगाव शाळा काॅलेज मध्ये तसेच ग्रामस्थांना वैद्यकीय उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र फणसगाव येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होत आहे. त्यामुळे रस्ता बंद झाल्यास शाळेच्या मुलांसह ग्रामस्थांनाही याचा फटका बसणार आहे. याबाबत उंडील सरपंच श्रीमती उज्वला यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.यावेळी त्यांच्या सोबत पोलीस पाटील सौ जयंती नर,माजी उपसरपंच भालचंद्र मांजरेकर, पुंडलिक सरवणकर आदी उपस्थित होते. याबाबत निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.