
सावंतवाडी : आंबोली, चौकुळ, गेळेचा जमिन प्रश्न ३० वर्ष प्रलंबित होता. महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत वहीवाट नाही अशा जमीनींच कधीही वाटप केलं नाही. या जमीनीच वाटप करण्यासाठी मी प्रयत्न केलेत. मी कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर देवळात नारळ ठेवा अन् मी अडवल्याच सांगा. मी हा प्रश्न सोडवल्याच मी नारळावर हात ठेवून सांगतो असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले. तर कावळेसादवर कोणाचा तरी डोळा असेल म्हणून हे केलं जातं असेल, अनेक लोकं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमीनी खरेदी करत सुटली आहेत असा टोलाही त्यांनी हाणला. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, येथील ग्रामस्थांची कर भरलेला आहे हे मी शासनाला सांगितले आहे. ऑर्डर मी काढून घेतली आहे. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही मी घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना स्थगिती दिल्यानं त्यांच्याविरुद्ध बंड केलं. ही स्थगिती शेवटपर्यंत त्यांनी उठवली नाही. आमच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही स्थगिती उठवली. त्याच्या वाटपाचा जीआर काढून घेतला. शासनाला लागणाऱ्या सोडून १०० टक्के जमीनीच वाटप व्हावं असा हा जीआर होता असं मत मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.
या जमिनी सावंतवाडी संस्थानच्या होत्या. त्यात लोकांनी लागवड करून खंड वसूल करावा म्हणून नेमलेले अधिकारी यांनाच कबुलायतदार गांवकर म्हणतात. आता या जमीनी महाराष्ट्र शासन व वन संज्ञेखाली आल्यात. येथील ग्रामस्थांवर झालेला अन्याय शासनाला मी पटवून दिला. मंत्रालयात स्तरावर याबाबतच्या बैठका घेतल्या. महाराष्ट्र शासन लागलेल्या जागा वाटप करण्यात येणार होत्या. मात्र, वन आणि महाराष्ट्र शासन लागलेल्या जमिनी एकत्रित वाटप करा अशी मागणी ग्रामस्थांची होती. त्यानुसार वनमंत्र्याशीही बैठक झाली. माझ्याकडून मी सर्व प्रयत्न केले आहेत. माझ्या मतदारांसोबत मी आहे. मी कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर माझं जाहीर आवाहन आहे देवळात नारळ ठेवा, मी हा प्रश्न सोडवल्याच हात ठेवून सांगतो. एखादा मनुष्य तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगितो अन् तुम्ही वाहवत जाता हे योग्य नाही. सगळेच अधिकार ग्रामस्थांना पालकमंत्री असताना दिलेत. कोणीही उठाव अन् माझं नाव घ्यावं हे मी सहन करणार नाही. आमचे पिढ्यानपिढ्यांचे गेळेशी संबंध आहेत. आम्हाला स्वतःचा स्वार्थ नाही. माझ्यावर प्रेम करणारी लोकं इथे आहेत. विनाकारण माझी बदनामी करू नये, माझ्यावर प्रेम करणारी आंबोली, गेळे, चौकुळची लोक आहेत.
दरम्यान, गैरसमज करून घेत लोकांनी बळी पडू नये. महाराष्ट्र शासनाच्या जमिनींचे वाटप ताबडतोब होऊ शकतं. फक्त एकाच्या शेतातून दुसऱ्याच्या शेतात जाण्यासाठी वाट असणं आवश्यक आहे. टाऊन प्लानिंग आवश्यक आहे. मी तळमळीने काम करतो. जोपर्यंत लोकांची इच्छा आहे तोपर्यंत आमदार राहणार आहे. ही सगळी जमिन महाराष्ट्र शासनाची आहे. कोणाची वहिवाट नाही, वहिवाट काढली असती तर जमिन मिळाली नसत. असं करून हा विषय रखडत ठेवणं योग्य नाही. मी हा प्रश्न सोडविण्यासाठी मेहनत घेतली. कावळेसादवर कोणाचा तरी डोळा असेल म्हणून हे केलं जातं असेल, अनेक लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमीन खरेदी करत सुटली आहेत असा टोला यावेळी मंत्री केसरकर यांनी हाणला. तर कावळेसाद हा महाराष्ट्रातील एकमेव पॉईंट आहे व तो शासनाच्या मालकीचा आहे. पुर्वी तो सावंतवाडी संस्थानच्या मालकीचा होता. येथिल शासनाला आवश्यक जमिन सोडून उर्वरित जमीन ही लोकांनाच वाटप केली जाणार आहे. जिल्हा परिषदची ४५ एकर जमिन दिली हे देखील लोकांना सांगण अपेक्षित होत. मी काहीही अडवल नाही, असेल तर त्यांनी सांगावं. दोन लाख पर्यटक येथे येतात. ही जमिन ग्रामस्थांच्या नावावर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सावंतवाडी माझं घर असून आंबोली, चौकुळ व गेळे हे माझं दुसरं घर मानतो. त्यामुळे लोकांनी गैरसमज करून घेऊ नये अस आवाहन दीपक केसरकर यांनी यावेळी केले.