
दापोली : दापोली तालुक्यातील करजगाव येथून गुरांची बेकायदा वाहतूक करणार्यावर आता एका बैलाची चोरी केल्याचाही गुन्हा दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली शहरातील बुरोंडी मार्गावरील लाल कट्टा परिसरात २७ मार्च रोजी रात्री १० चे सुमारास गुरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावर दापोली पोलिसांनी घटनास्थळी जावून टेम्पो सह ३ गुरे ताब्यात घेतली होती. त्यात १ बैल, एक गाय व एक पाडा यांचा समावेश होता. याप्रकरणी दापोली पोलिसांनी ४ संशयीता विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.
मात्र टेम्पोसह ताब्यात घेतलेल्या एक बैल बुरोंडी भांडारवाडा येथील आनंद प्रफुल्ल केळसकर यांचा होता. केळसकर यांनी त्यांची गुरे त्यांच्या मालकीच्या कम्पाउंड मध्ये चरण्यासाठी सोडली होती. २७ मार्च रोजी सायंकाळी ते गुरांना परत आणण्यासाठी तेथे गेले असता त्यांना त्यांचा एक बैल दिसला नाही. त्यानंतर रात्री एका टेम्पो मधून गुरांची बेकायदा वाहतूक करणार्यांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समजताच ते दापोली पोलीस ठाण्यात आले व त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या त्या टेम्पो मधील गुरांची पाहणी केली. त्यांना त्यांचा बैल टेम्पोत दिसल्यावर त्यांनी आपला १२ हजार रुपये किमतीचा बैल देवेंद्र रवींद्र झगडे, गोरखनाथ मधुकर शिंदे, सदानंद विठोबा जाधव यांनी चोरून नेल्याची तक्रार दापोली दापोली ठाण्यात दिली होती. या तक्रारीनुसार या ३ संशयीताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.