
दापोली : दापोली शहराजवळ असलेल्या चंद्रनगर येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करून कपाटातील लॉकरमधून रोख रुपये 70 हजार चोरून नेत, घरातील उपयोगी साहित्यावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून ते जाळण्यात आल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रनगर येथील सखाराम हरी जगदाळे वय 72, हे पत्नीसह काल ता. 6 रोजी सकाळी 8 वाजता जवळच्या वाडीतच लग्नाला जाताना घराच्या दरवाजाला कुलूप लावून कुलूपाची किल्ली घराजवळ नेहमीच्या ठिकाणी ठेवून ते लग्नाच्या ठिकाणी गेले. रात्री 8 वाजणेचे सुमारास त्यांच्या शेजाऱ्यांनी कॉल करून तुमच्या घरात काहीतरी जळत असल्याचे त्यांना सांगितल्यावर ते घरी परतले. तेव्हा त्यांच्या घरातील मांडणीवर ठेवलेले घरातील साहित्याला कोणीतरी आग लावलेली असल्याचे त्यांना दिसल्यावर त्यांनी ती शेजाऱ्यांच्या सहाय्याने विझविली. त्यांनी घरातील कपाट उघडून पाहिले असता कपाटातील लॉकर मधील 70 हजार रुपयेही चोरीला गेल्याचे त्यांना समजले. त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीची तक्रार दाखल केली असून दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख करत आहेत.
चंद्रनगर येथे घराच्या दरवाजाला कुलूप लावून चावी घराजवळच ठेवल्याचा फायदा चोरांना होत असून अशाच प्रकारे तीन चोऱ्या चंद्रनगर येथे झाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.