
सिंधुदुर्गनगरी : मुंबई गोवा महामार्गावरून अवैध गुटख्याची होत असलेल्या अवैधरित्या वाहतुकीवर आज ओरोस येथील जिजामाता चौक येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ७ लाख ५३ हजार ३८० रुपयांच्या गुटखा सह १५ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तसेच अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी अभय नारायण केसरकर (४३) रा. बांदा व महादेव सुभाष नेवगी (३३) रा. इन्सुली यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (२)(iv), २७ (३)(डी)(इ) सह वाचन कलम ३० (२) (अ) चा भंग कलम ५९ प्रमाणे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार या विभागाचे पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करत आहे. तसेच आज पहाटे मुंबई गोवा महामार्गावरुन कणकवलीच्या दिशेने पहाटे अवैध गुटख्याची बोलेरो गाडीतून वाहतूक होणार आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ओरोस जिजामाता चौक येथे सापळा रचला होता. यावेळी कणकवलीच्या दिशेने जाणारी बोलेरो पीकअप गाडी (एमएच ०७ ए जे २८५१) थांबून ती गाडी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे येथे आणून तपासली असता आत ७ लाख ५३ हजार ९८० रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. त्यामुळे ८ लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप आणि ७५३९८० रुपयांचा गुटखा असा एकूण १५ लाख ५३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गाडी चालक अभय नारायण केसरकर रा. बांदा काळसेवाडी, व त्याचा साथीदार महादेव सुभाष नेवगी (३३) रा. इन्सुली डोववाडी, सावंतवाडी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (२)(iv), २७ (३)(डी)(इ) सह वाचन कलम ३० (२) (अ) चा भंग कलम ५९ प्रमाणे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.