युवकांच्या मनात जाज्वल्य देशप्रेमाची भावना असली पाहिजे

पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 06, 2023 16:15 PM
views 127  views

सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आज जगातील महासत्तेच्या होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. यांमध्ये युवकांचे नक्कीच मोठे योगदान आहे. त्यामुळे युवकांच्या मनामध्ये जाज्वल्य देशप्रेमाची भावना असली  पाहिजे. आजच्या युवक पिढीने आपल्या आयुष्यातील काही क्षण देशसेवेसाठी दिल्यास याच युवा पिढीमधून उद्याचा सैनिक, डॉक्टर, इंजिनिअर नक्कीच निर्माण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील जिल्हा क्रिडा संकुलाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एनसीसी कॅडेटच्या प्रशिक्षण स्थळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी एनसीसीच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की, देशाला महासत्ता बनविण्याची ताकद ही युवकांमध्ये आहे. आपला भारत देश हा सर्वात युवकांच्या दृष्टीकोनातून पुढे जात आहे व जगातील सर्वांत तरुण देश म्हणून भारताची प्रतिमा आहे.


तत्कालिन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावरुन उतरल्यांनतर त्यांनी खेडया-पाड्यातील तरुणांची भेट घेऊन देशासाठी मी काय करु शकतो याचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्येक गावामधील तरुण व तरुणींना देशाच्या सेवेसाठी काय विचार केला पाहिजे याचा परिपाठ त्यांनी दिला. युवकांच्या व देशाच्या नागरिकांच्या मनामध्ये जाज्वल्य देशप्रेम असले पाहिजे असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले. प्रत्येक युवकाने आपल्या आयुष्यात अशी प्रतिज्ञा केली पाहिजे की, आपण असे काही काम केले पाहिजे की, जे देशासाठी महत्त्वाचे असेल. देशसेवेचे हे काम करण्यासाठी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी अर्पण करु शकेन असे सांगतानाच मंत्री चव्हाण यांनी सांगितले की,एनसीसी, स्काऊट गाईड यासारखे शालेय जीवनातील उपक्रम हे ख-या अर्थाने आपल्याला आपल्या आयुष्यात चांगली शिस्त देत असतात.


देशसेवेसाठी युवकांचे फार मोठे योगदान आहे, त्यामुळे युवकांनी व विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनापासून देशसेवेचा विचार करण्यास सुरुवात केली पाहिजे. असा सकारात्मक विचार केल्यास तुमच्यामधीलच एनसीसी कॅडेट देशाचा कर्नल होऊ शकतो, देशाच्या संरक्षणासाठी कार्य करु शकतो, तुमच्यामधूनच एक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर घडू शकतो व तो देशाची सेवा करु शकतो असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.