
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावातील मनोज मोहन माळकर हा युवक गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या उपचारासाठी सोळा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर व्हीएनएस सर्जरी होणार आहे. यासाठी वरील रक्कम उभी करणे माळकर कुटुंबीयांना शक्य नाही. आपल्या परीने त्याचे नातेवाईक पैसे जमविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दानशूर व्यक्ती व काही संस्था यांनी पुढे येऊन मनोज माळकर यांना या गंभीर आजारातून बरे करण्यासाठी आपल्या परीने आर्थिक मदत करावी असे आवाहन माळकर कुटुंबीयांनी केले आहे.
जुलै २०२२ पासून सतत उचकी आणि उलट्या यांनी सदर तरुण त्रस्त असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. गेल्या वर्षभरात गोवा, कोल्हापूर, मुंबई येथील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेतले. पण डॉक्टरांच्या मते, ही एक दुर्मिळ केस असून त्यावर सहज उपचार करता येणे शक्य नाही. सर्व प्रकारच्या चाचण्या आणि वैद्यकीय अहवालानंतरही आतापर्यंत या आजाराचे अचूक निदान करता आलेले नाही. कोणत्याही औषधोपचाराने यावर उपाय होत नसल्याने डॉक्टरांच्या मते व्हीएनएस सर्जरी लाभदायक ठरू शकते. या आजारावर ही सर्जरी करण्याचा पहिलाच प्रयोग असल्याने त्याला आरोग्यविम्याचे संरक्षण नाही. ही शस्त्रक्रिया लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथे होणार आहे.
गेल्या वर्षभरात सदर तरुणाने उपचारांवर १० लाखांहून अधिक खर्च केले आहेत. व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशन डिव्हाईस इम्प्लांटसाठी १६ लाख खर्च आहे. त्यामुळे उपचारासाठी आर्थिक स्वरूपात मदत करावी असे आवाहन माळकर कुटुंबीयांनी केले.
मदतीसाठी मनोज मोहन माळकर, बँक ऑफ इंडिया, कोनाळकट्टा शाखा, खाते क्र. १४३११०११०००१६०२, आयएफएससी कोड ०००१४३१. गुगल पे, फोन पे नं : ९३२४१९२४९२ यावर मदतीचे आवाहन करण्यात आले आहे