महावितरणच्या लापरवाहीमुळे तरुणाचा गळा कापला...!

करंजे येथील घटना
Edited by:
Published on: July 24, 2024 12:37 PM
views 1329  views

कणकवली : हरकुळ ते कणकवली असा दुचाकीवरून प्रवास करत असताना तुटलेल्या गार्डनिंग तारेमुळे तरूणाचा गळा कापला गेला. ही घटना काल सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. महावितरण च्या या लापरवाहीमुळे संतप्त झालेल्‍या ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणकडे धाव घेऊन, तेथील अभियंत्‍यांना धारेवर धरले. यावेळी झालेल्‍या चर्चेत जखमी तरूणावर होणारा वैद्यकीय खर्च करण्याची तयारी महावितरण अभियंत्‍यांनी दाखवली. दरम्‍यान त्‍या तरूणावर खासगी रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. हरकुळ खुर्द येथील सुजित तेंडुलकर (वय ३०) हा तरूण दुचाकी वरून हरकूळ खुर्द ते कणकवली असा येत होता.

सकाळी साडे दहा सुमारास तो करंजे येथे आला असता वीज तारांना सुरक्षा देण्यासाठी असलेल्‍या आणि रस्त्यावर तुटून पडलेल्‍या गार्डनिंग तारेमध्ये अर्धा गळा चिरला. प्रसंगावधान राखून त्‍याने गळ्याला रूमाल बांधून व एका हाताने दुचाकी चालवत कणकवली गाठली. तेथे आल्‍यानंतर त्‍याच्या मित्रांनी त्‍याला तातडीने खासगी रूग्‍णालयात दाखल केले. दैव बलवत्तर म्‍हणून तो युवक वाचला. महावितरणच्या या बेपर्वाईबाबत संतप्त झालेल्‍या ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय गाठले आणि तेथे उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांना धारेवर धरत या घटनेचा जाब विचारला.

त्‍याबरोबरच श्री.बगडे यांना खासगी रूग्‍णालयात बोलावून घेतले. महावितरणने अशा तारा लोंबकळत असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे त्याच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याचा सगळा वैद्यकीय खर्च करा व त्याचे कामावर न गेल्यामुळे होणारे नुकसानही भरून द्या, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख सतीश सावंत यांनी केली. दरम्यान, जखमी सुजित तेंडुलकर यांना वैद्यकीय खर्चासाठीची मदत महावितरणतर्फे केली जाईल, अशी ग्‍वाही उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी दिली. तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, रीमेश चव्हाण आदी उपस्थित होते.