
वैभववाडी : गडमठ कदमवाडी येथील राकेश रवींद्र कासले, वय ३९ या तरुणाने राहत्या घरी साडीच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज (ता.२०)सोमवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत रघुनाथ महादेव मठकर रा. गडमठ तेलीवाडी यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत खबर दिली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
गडमठ कदमवाडीत राकेश कासले यांचं घर आहे. या घरात तो एकटाच राहत होता. काही वर्षांपासून तो पत्नीपासून अलिप्त राहत होता. रविवारी रात्री तो घरी होता. मात्र सोमवार तो सकाळी उशिरापर्यंत घराबाहेर आला नाही म्हणून त्याच्या घराशेजारील गवंडी काम करणारे रघुनाथ मठकर यांनी त्याला हाका मारल्या, परंतु त्यांना त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना राकेश हा घरात साडीने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यांनी याबाबत शेजारच्या लोकांना माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलीसांना कळविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक किरण घाग, पोलीस संदीप कांबळे, राहुल तळसकर, अभिजित राणे, जितेंद्र कोलते हे घटनास्थळी आले.त्यांनी पाहणी केली असता राकेश हा मृतावस्थेत होता. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सध्या मृतदेह येथील शवागृहात ठेवण्यात आला आहे. मुंबई येथे राहत असणारा त्याचा भाऊ आल्यानंतर मंगळवारी त्याच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात येणार आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस धनाजी धडे करीत आहेत.