
लोटे : काल मंगळवार १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी, लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील पुष्कर केमिकल्स कंपनीत शेकोटीमुळे अचानक वाढलेल्या आगीत दोन कामगार भाजले. गेल्या वर्षभरात पुष्कर केमिकल्स कंपनीत ही अपघातांची मालिका सुरूच आहे. लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये सततच्या होणाऱ्या लहान मोठ्या अपघातांमुळे कामगार आणि परिसरातील रहिवाशांचे आयुष्यमान धोक्यात आहे. जखमींवर चिपळूण मिरजोळी येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये काल पासून डॉ.इसहाक खतीब उपचार करीत आहेत.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील पुष्कर केमिकल्स कंपनीत परिसरात रात्रपाळीतील कामगार पहाटे थंडीमुळे , कंपनी परिसरात शेकोटी करून शेकत बसले होते. यातील सोनू पुजारी हा कर्मचारी कंपनीत ऑपरेटर असून तो ३६ टक्के भाजला आहे. त्याचे दोन्ही पाय, हात, तोंडावर गंभीर जखमा आहेत. तर दुसरा ठेकेदारी कामगार म्हणून कार्यरत असलेला सत्यनारायण कुमार दोन्ही पाय मिळून १८ टक्के भाजला आहे.
यावेळी शेकोटी पेटण्यासाठी आसपास चे भंगार किंवा ज्वलनशील वस्तू टाकल्याने आग अचानक भडकल्याने, शेकोटीजवळ बसलेले हे दोघे गंभीररित्या होरपळले आहेत. अशी माहिती रुग्णालयात आणि ठेकेदारांच्या माणसांकडून देण्यात आली आहे. याबाबत लाईफ केअर रुग्णालयातून एम एन सी चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयातून डॉ.साहिल परदेशी यांनी सांगितले.
केमिकल कंपनीत अपघात, आग, ज्वलनशील पदार्थ वापर आदी सुरक्षा विषयक काळजी घेणे आवश्यक असताना, कंपनी आवारात कामगार शेकोटी पेटवून, शेकोटीसाठी ज्वलनशील पदार्थ कसे काय वापरू शकतात. यामुळे कंपनीच्या सुरक्षा विषयक धोरणाविषयी शंका उपस्थित होत आहे. कंपनीचे अधिकारी श्री.चौहान यांचेशी संपर्क केला असता, त्यांनी बोलण्याचे टाळत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा संचलनालय कोल्हापूर विभागाच्या अधिकारी यांनी यांचा खुलासा करणे आवश्यक आहे.