
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ही भावना नजरेसमोर ठेवते ती म्हणजे नर्स (परिचारिका) होय. असल्याचा अभिमान आहे. नर्स ही जगाला देवाने दिलेला एक अवतार आहे. रुग्णसेवेचा भार खांद्यावर घेऊन रुग्णांना नवजीवन देण्यात परिचारिकांचा मोठा वाटा असतो. हे एक निःस्वार्थ सेवा असून आपल्या कुटंबियांसह रुग्णांची काळजी घेणाऱ्या परिचारिका कार्य सर्वश्रेष्ठ व ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन मीनाक्षी पाटील यांनी केले. अरिहंत हॉस्पिटलमध्ये जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधुरी दीक्षित उपस्थित होत्या.
पाटील पुढे म्हणाल्या, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असले तरी त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी परिचारिकांवर असते. आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करण्याची दृढ इच्छाशक्ती ही केवळ परिचारिकांमध्येच असू शकते. त्यांची सेवा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्येपासून रुग्णाला मुक्ती मिळवून देण्यात परिचारिकांचा खरिचा वाटा असतो, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी, अरिहंत हॉस्पिटल अत्यंत कमी दिवसांत नावारुपास आले आहे. हे हॉस्पिटल उत्कृष्ट डॉक्टरांसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण आता सर्वश्रेष्ठ परिचारिकांसाठीही प्रकाशझोतात आले आहे. परिचारिकांचे हॉस्पिटलमधील महत्त्व अधोरेखित करत त्यांनी परिचारिकाच हॉस्पिटल चालवतात. त्यांच्याविना हॉस्पिटल कार्यरत ठेवणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परिचारिका दिनानिमित्त हॉस्पिटलच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बेस्ट नायटिंगेल व मदर टेरेसा पारितोषिक देऊन परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
परिचारिकांचे समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी
परिचारिकांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. महिलांना घर व नोकरी सांभाळताना तारेवरची कसरतच करावे लागते. मात्र बहुसंख्य परिचारिका या संपूर्ण कुटुंब सांभाळत आपली रुग्णसेवा अखंडितपणे लीलया पेलतात. त्यामुळे त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्याचबरोबर परिचारिकांचे रुग्णसेवेप्रती असणारे समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन डॉ. एम. डी. दीक्षित यांनी केले.
याप्रसंगी डॉ. वरदराज गोकाक, डॉ. निखिल दीक्षित, डॉ. गणेश कोप्पद, डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे, डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. सूरज पाटील, डॉ. युवराजकुमार यड्रावी यांच्यासह डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी उपस्थित होते.