'हेल्पर्स ऑफ दी हँडीकॅप'चे कार्य कौतुकास्पद - ॲड. मनोजकुमार शिंदे

१०० कर्णबधीर रुग्णांना कानाच्या मशीनचा लाभ
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 16, 2022 17:36 PM
views 152  views

शशिकांत मोरे

रोहा : समाजातील अपंग व्यक्तींना कुठल्या ना कुठल्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. शारीरिक आव्हाने समोर असली तरी आपले कार्यच आपले महत्त्व समाजासमोर आणते. त्यासाठी गरज आहे ती जिद्दीची. अशाच जिद्दीतून अपंगत्व असूनही स्वतःच्या अपंगत्वावर मात करुन, जिद्दीने काम करण्याचे मनोधैर्य जे वाढविले जाते, त्या कार्याला निश्चितच सलाम करायला हवा, हे पुण्याचे काम आहे. त्यामुळे याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, संस्थेतील प्रमुखांनीच विविध कला आत्मसात केली असल्याने त्यांचे मनापासून कौतुक असून अपंगत्वावर मात करून स्वतःला सिद्ध करण्यासाठीचे हेल्पर्स ऑफ दी हँडीकॅप संस्थेचे कार्यही कौतुकास्पदच असल्याचे गौरवोद्गार ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी काढले.

दिव्यांगांना प्रेरणा मिळावी म्हणून जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रोह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात नुकत्याच हेल्पर्स ऑफ दी हँडीकॅप संस्थेच्या वतीने आयोजित अपंग आणि कर्णबधिर शिबिराप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर, सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप (आप्पा) देशमुख, बंडोपंत हराळे, राहुल भोसले, भाजपा शहर अध्यक्ष शैलेश रावकर, लायन्स क्लबचे मिलन शाह, नाना देशमुख, प्रशांत देशमुख, अमोल देशमुख, समिधा अष्टीवकर आदींसह रायगड जिल्ह्यातील दिव्यांग सदस्य उपस्थित होते.

मिलींद अष्टीवकर यांनी सांगितले की, एखादा माणूस जेंव्हा चांगले काम करीत असतो, तेव्हा वाटेवर त्रास देणारे, थांबविणारे लोक भेटतात, पण या सर्व गोष्टीवर मात करून आज संस्थेने केलेल्या कामाचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे.

यावेळी बंडोपंत हराळे, राहुल भोसले यांसह मान्यवरांनी आपली मते मांडली. कोरोना काळात दिव्यांगांना रोहा तालुक्यातील युवक प्रतिष्ठान, लायन्स क्लब ऑफ रोहा, उपजिल्हा रुग्णालय रोहा, सुदर्शन केमिकल रोहा, पंचायत समिती रोहा, रोहा अष्टमी नगरपरिषद, तालुका वैद्यकीय विभाग या विभागातील अधिकारी वर्गाला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात सोहम देशमुख, निलेश कर्णेकर यांना धाडस पुरस्कार, सतीश भोईर, सुनीता जाधव, तुषार पवार यांना शैक्षणिक पुरस्कार तर उज्वला देशमुख, गुलाब सानप, प्रियांका कदम, रुपाली सुतार यांना हेल्पर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे नेते नील सोमय्या व किरीट सोमय्या यांनी कर्णबधीर रुग्णांना दिलेल्या १०० कानाच्या मशीनचा रुग्णांनी लाभ घेतला. तर संस्थेच्या रायगड प्रकल्प प्रमुख रोशन देशमुख यांनी राबविलेल्या शिबिराचे असंख्य रुग्णांनी कौतुक केले.संस्थेच्या सर्व पदाधिकारी वर्गाने शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. रोशन देशमुख यांनी आभार मानले.