
सावंतवाडी : तृतीयपंथीच्या वेशात येऊन तिघा पुरूषांनी शहरातील एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये घुसून महिला घरी एकटी असल्याचं पाहून तिच्याकडून तब्बल सात हजार रुपये लुबाडल्याची घटना शहरात घडली. याबाबत त्या महिलेसह सोसायटीमधील जागृत नागरिकांनी पोलिसात धाव घेत तक्रार केल्यानंतर तिघांना कुडाळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
सावंतवाडी शहरात आज सकाळी तिघा पुरूषांनी तृतीय पंथीचा वेश घेत शहरातील वनविभाग कार्यालय परिसरात असलेल्या एका सोसायटीमध्ये प्रवेश करत तेथील फ्लॅटमध्ये जाऊन पैशाची मागणी केली. येथील महिला एकटी असल्याच समजताच त्यांनी तब्बल 21 हजार रुपयांची मागणी केली. यावेळी त्यांनी महिलेसोबत चुकीची वागणूक केली. मात्र, घाबरलेल्या त्या महीलेन यातून सुटका करुन घेण्यासाठी त्यांना सात हजार रुपये रोख देऊन त्यांना पाठविले.
हा प्रकार त्यांनी सोसायटीच्या लोकांना सांगितला. झालेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता सोसायटीमधील नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. संबंधित तृतीयपंथीचे वेश घेऊन आलेले कुडाळ येथे रवाना झाले होते. मात्र, त्यातील एक जण कोलगाव येथे पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून माहिती घेत संबंधितांना पोलिसांनी कुडाळ येथून ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. हे तरुण कुडाळ येथे आपल्या कुटुंबासह राहतात ते तृतीय पंथीच्या वेशात येऊन पैशाची मागणी करतात, त्यामुळे नागरिकांनी सजग राहावे असे आवाहन सावंतवाडी पोलिसांनी केले आहे.