कणकवली शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

गड नदीपात्र सुकल्याने प्रशासनाचा निर्णय
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 18, 2023 11:44 AM
views 365  views

कणकवली शहरालगतचे गडनदीपात्रात खडखडाट असल्याने शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आज नगरपंचायत प्रशासनाने दिली. दरम्यान शिवडाव धरणातील पाणी शुक्रवारी सोडण्यात आले आहे. हे पाणी बुधवार पर्यंत कणकवलीपर्यंत येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गडनदीपात्रातील केटी बंधाऱ्यामध्ये यंदा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाणी अडविण्यास प्रारंभ करण्यात आला. तोपर्यंत नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात आटले. त्यामुळे यंदा केटी बंधाऱ्यांमध्ये अल्प पाणीसाठा झाला. सध्या गडनदीपात्र आटले असून शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या करकीची कोंड येथील पाणीसाठाही जवळपास संपला आहे. त्यामुळे 18 व १९ एप्रिल रोजी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आज नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.

शहराच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने गेल्या आठवड्यात पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर शुक्रवारी शिवडाव धरणातील पाणी गडनदीपात्रात सोडण्यात आले. हे पाणी बुधवार पर्यंत कणकवली शहरालगतच्या गडनदीपात्रात दाखल होण्याची शक्यता आहे. धरणाचे पाणी दाखल होताच शहरवासीयांना नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान शहरातील करकीची कोंड येथील डोहातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने आज पर्यंत शहरातील नळ कनेक्शन धारकांना पाणी पुरवठा करण्यात आला. तर पुढील दोन दिवस शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मात्र धरणातील पाणी साठा नदीपात्रात दाखल झाल्यानंतर पाऊस पडेपर्यंत शहरवासीयांची पाणी टंचाईतून सुटका होणार आहे.