पाणी पुरवठा विभागाच नियोजनशून्य काम ?

▪️पाणी मुरतंय कुठे ?
Edited by: विनायक गांवस
Published on: March 25, 2026 14:11 PM
views 181  views

सावंतवाडी : शहरासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ५७ कोटीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाण्याची जुनी लाईन बदलण्यात येत आहे. मात्र, नियोजनाचा अभाव अन् ठेकेदार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या भरोवश्यावर प्रशासन राहिल्याने जुनी लाईन फुटणे, गॅस पाईप लाईन फुटण्यासारखे प्रकार शहरात घडत आहेत. त्यामुळे नाहक मनस्ताप शहरवासीयांना सहन करावा लागत असून पाणीपुरवठा अभियंताच नसल्याने हे पाणी मुरतंय कुठे ? असा सवालही उपस्थित होत आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून हे काम शहरात सुरु आहे. जून महिन्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. मात्र, नियोजनाचा अभाव या कामात दिसून येत आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पाणी पुरवठा अभियंता नसताना हे काम कुणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ? असा सवाल सभागृहात उपस्थित करत ५७ कोटी पाण्यात जाण्याची भिती व्यक्त केली होती. यानंतर प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी कामाच्या ऑडीट नंतरच ठेकेदाराला बील अदा करण्यात येतील, कामात हयगय सहन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यापार्श्वभूमीवर नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हे काम सोपवावे अशीही मागणी केली. आज शहरात काम सुरू असताना जुन्या पाईप लाईन फुटत आहेत. निष्काळजी कामामुळे शेकडो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली आहे. खासकीलवाडा पाटणकर वाड्यालगत हा प्रकार घडला असून नवीन लाईन टाकल्यानंतर जुनी लाईन फुटून शेकडो लिटर पाणी वाया गेले आहे. या तक्रारीची दखल घेत लागलीच त्यावर प्रशासनाकडून दुरूस्ती करण्यात आल्याचे पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी सांगितले.‌ एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे नळपाणी योजनेची लाईन रस्त्यापासून २ फुट खाली टाकायची असताना मोरडोंगरी परिसरात ३ फुट खाली असणारी गॅस पाईपलाईन फोडल्याचा प्रकार घडला. पाणी पुरवठा विभागाच्या चुकीमुळे गॅस पाईपलाईन फुटली. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. नॅचरल गॅस हवेत विरल्याने पुढचा धोकाही टळला. यावेळी घटनास्थळी न.प.चे कर्मचारीही उपस्थित नव्हते त्यामुळे नागरिकांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

न.प. मधील पाणी पुरवठा अभियंता पद रिक्त असताना पदभार सांभाळणाऱ्या अधिकारीही रजेवर आहेत. दुसरे ऑपरेटर साईट व्हिजिटसह मार्च एंड असल्याने वसूलीच्या कामात आहे. ही सगळी परिस्थिती बघाता खोदाई करत असताना जुन्या पाईप लाईनसह गॅस पाईपलाईनचा आराखडा प्रशासनाकडे उपलब्ध नव्हता का ? जर असेल तर पाईपलाईन टाकतताना जुन्या लाईन फोडून डबल काम का वाढवलं जातय ? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना विचारले असता ते म्हणाले, कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अन् ठेकेदार आहेत. पीएमसी हे न.प.चे प्रतिनिधी असून वेगळ्या कर्मचाऱ्याची नेमणूक केलेली नाही. पीएमसी, ठेकेदार तेथे काम करत असून आमचा सिव्हिल इंजिनिअर यावर देखरेख ठेवतो. तर वसुली हा विषय केवळ मार्च महिन्याचा असून मुख्य काम करून ५ तास त्यासाठी द्यायच्या सुचना कर्मचाऱ्यांना केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जुनी लाईन व गॅस पाईपलाईन फुटण्याचा प्रकार बघता रत्याखालील लाईनचा आराखडा न.प. कडे उपलब्ध नाही का ? असा सवाल केला असता ते म्हणाले, गॅस लाईन व नव्या नळपाणी योजनेच्या लाईनचा आराखडा आमच्याकडे आहे. जुन्या पाईप लाईनचा आराखडा उपलब्ध नाही. आताचे काम करताना जुनी लाईन जीर्ण झाल्याने काही ठिकाणी फुटण्याचे प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदरीतच, पाणी पुरवठा अभियंता नसल्याने व पीएमसीच्या भरोवश्यावर न.प. प्रशासनाच काम सुरू असल्याने नियोजनाचा अभाव पाणी पुरवठा विभागाच्या कामात दिसून येत आहे. पाण्याच्या जुन्या पाईप लाईनसह गॅस लाईन फुटण्याचे प्रकार बघता प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत याचा नाहक मनस्ताप मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे.