तिलारी धरणातील पाण्याची गुणवत्ता उत्तम

Edited by:
Published on: October 06, 2024 06:44 AM
views 280  views

दोडामार्ग : तिलारी धरणातील पाण्याची गुणवत्ता तपासणी दर तीन महिन्यांनी केली जाते. बदल होत असलेल्या वातावरणाचा पाण्यावर काय परिणाम जाणवतो? हे तपासले जाते. मागच्या 3 महिन्यातील अहवालानुसार या धरणाच्या पाण्याची गुणवत्ता लगतच्या इतर धरणांपेक्षा उत्तम असल्याचे भारतीय समुद्र विज्ञान संस्थेच्या वरिष्ठ मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हेमा उस्कैकर यांनी सांगितले आहे.

भारतीय समुद्र विज्ञान संस्थेच्या डॉ. हेमा उस्कैकर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हनुमंत दळवी व शिकाऊ संशोधन विद्यार्थिनी प्रतीक्षा फातर्पेकर यांनी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी तिलारी धरणाला गुरूवारी भेट दिली. दोन दिवसीय चाललेल्या या तपासणीत त्यांनी धरणातील विविध ठिकाणचे धरणाच्या तळाशी असलेल्या पाण्याचे नमुने घेतले. प्रथम दोन, नंतर चार व प्रत्येकी एका तासाने असे पाण्याचे नमुने गोळा केले. पाण्याच्या वरच्या व तळाच्या पातळीच्या पाण्यात ऑक्सिजन, इतर गॅस ज्यात मिथेन असते त्यांच्या प्रमाणात भिन्नता असते. शिवाय गरमीच्या दिवसांतही पाण्याची ऑक्सिजन लेवल कमी होते असे सांगत गोळा केलेल्या या नमुन्यांचे निरीक्षण करून अहवाल यायला थोडा अवधी लागणार असल्याचे डॉ. हेमा उस्कैकर यांनी सांगितले.

ही संस्था गोवासह कर्नाटक  धरणांच्या पाण्याची गुणवत्ता तपासते. वातावरणात सतत बदल पाण्यावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे पाणी प्रदुषण होऊन त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम जाणवतो. म्हणून वातावरणातील बदलांचा या पाण्यावर किती विपरीत परिणाम जाणवला ? या पाण्याचे प्रदूषण किती प्रमाणात झाले आहे ? याचे संशोधन ही संस्था करते. प्रत्येक तीन महिन्यांनी तिलारी धरणाच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी केली जाते. मागच्या अहवालानुसार या धरणाच्या पाण्याची गुणवत्ता ही इतर धरणांच्या तुलनेत अधिक असल्याचे डॉ. हेमा उस्कैकर म्हणाल्या.