
देवगड : देवगड-जामसंडे शहरांना सध्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत जामसंडे-घाडीवाडी परिसरातील २५ ते ३० पेक्षा जास्त विहिरींची पाण्याची पातळी अचानक ५ ते ६ फुटाने वाढल्याचा अजब प्रकार घडला. हा चमत्कार पाहून नागरिकही अचंबित झाले. त्याच बरोबर पाणी टंचाई दूर झाल्याने काहीसे सुखावलेही. याबाबत नागरिकांमधून अनेक तर्कविर्तक सुरू झाले. मात्र, हा चमत्कार देवगड नळयोजनेच्या लिकेज पाईपचा असल्याचे दिसून आले.
येथील नागरिक सुखावले आणि चकीतही झाले आहेत. जामसंडे-घाडीवाडी, बौद्धवाडी तसेच इतर भागातील विहिरीने पूर्णतः तळ गाठला होता. पाणीटंचाईचे मोठे सावट या भागात होते. टँकरने किंवा टेम्पोने पाणी विकत घेण्याची वेळ येत होती. वारंवार फुटणाऱ्या नळयोजनेमुळे नळयोजनेचे पाणीदेखील बंद होते. मात्र, अचानक येथील विहिरींमध्ये पाच ते सहा फूट पाणी वाढल्याने टंचाईची भीती संपली आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने येथील नागरिक सुखावले आहेत.
राजापूर व दहिबाव गंगेच्या उगमनानंतर जवळपास पंधरा दिवसानंतर हा प्रकार घडला असून जामसंडे-घाडीवाडी परिसरातील अशा प्रकारचीही पहिलीच नैसर्गिक घटना असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. देवगड-जामसंडे नळ योजनेची पाईपलाईन पूर्णपणे जीर्ण झाली असून ही पाईपलाईन देवगड-नांदगाव महामार्गावरील मेनरोड नजीक जामसंडे-बौद्धवाडी ते महाराष्ट्र बैंक यादरम्यान फुटली होती.
या फुटलेल्या नळ योजनेच्या पाईपमधील लाखो लीटर पाणी दिवसागणिक वाया जात होते. हे पाणी येथील जमिनीत झिरपल्याने परिसरातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली होती. मात्र आता पाईपलाईनला लागलेली गळती शोधून पाईपलाईन दुरुस्त करण्यात आल्याने वाया जाणारा पाणीपुरवठा रोखण्यात उशिरा का होईना यश आले आहे. मात्र, या लागलेल्या नळ योजनेच्या गळतीमुळे येथील परिसरातील पाणीटंचाईचे सावट तूर्तास तरी दूर झाले आहे.