सावंतवाडीत दिव्यांगांचा घुमला आवाज दिव्यांग कार्यशाळा, जनजागृती मोहीम संपन्न..!

साहस प्रतिष्ठान, सामाजिक बांधिलकी, व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचे संयुक्त आयोजन
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 04, 2022 15:19 PM
views 172  views

सावंतवाडी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व सामाजिक बांधिलकी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील शहाबुद्दीन काझी सभागृह येथे 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस' साजरा. कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर होते. मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गचे अधीक्षक विद्याधर कदम,  उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते बाळा बोर्डवेकर, सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, अॅड. अशोक पेडणेकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, रवी जाधव, प्रा. दीपक पाटील, समीरा खलील, रूपा मुद्राळे, शेखर सुभेदार, बंटी माठेकर आदी उपस्थित  होते

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गचे अधीक्षक कदम यांनी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाचा इतिहास कथन केला. तसेच भारत सरकारने अपंगांसाठी रेल्वे व एसटीने प्रवास करणेसाठी तिकीट प्रवासात सवलत दिलेली आहे. रेल्वेमध्ये एक डबा आरक्षित ठेवण्यात आला व एसटीमध्ये सीट आरक्षित ठेवण्यात आली. दिव्यांग व्यक्तींसाठी नोकरीत ४ % आरक्षण ठेवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सन १९६७ साली महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून बेरोजगार दिव्यांग व्यक्तींसाठी कर्ज योजना व्यवसाय सुरू करण्यासाठी केली. तसेच सन २०१६ साली दिव्यांग हक्क अधिनियम कायदा केंद्र सरकारने करून दिव्यांगांचे ७ प्रकारावरून २१ प्रकार केले, अशी माहिती अधीक्षक व्ही. डी. कदम यांनी दिली. तसेच विधी सेवा प्राधिकरण च्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. न्यायालयात दिव्यांगांसाठी वेगळा लॅटरीन, टाॅयलेट, वाॅशरूमची व्यवस्था, वाहन आत येण्यासाठी वेगळा मार्ग या व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत. अशी देखील माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाचे वेळी रु.१०००/- ची देणगी दिव्यांग मुलांसाठी देखील अधीक्षक कदम यांनी साहस प्रतिष्ठानच्या संचालिका रुपाली पाटील यांच्याकडे दिली.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, दिव्यांग व्यक्तींनी खचून न जाता मदर तेरेसा, सिंधुताई सकपाळ यांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून उंच भरारी घेण्यासाठी प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चितच मिळेल. तसेच सामाजिक कार्यकर्त्या, उपेक्षित महिला, आशा स्वयंसेविका यांच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी निसर्गाच्या निर्मितीची देणगी आहे. पक्षी वेगवेगळ्या रंगांचे असतात तसेच माणसांचे आहे. कावळा, मैना काळ्या रंगाच्या असल्याने प्रिय नाहीत. मात्र मोर, पोपट, बगळा प्रिय असतात. आपणही निसर्गाच्या निर्मितीची कदर करुन वेगळेपणाचा ठसा उमटविला पाहिजे, असे सांगितले.

यावेळी बाळा बोर्डवेकर, संजय पेडणेकर, शिर्के मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या संचालिका रुपाली पाटील यांनी केले. 


रॅलीने वेधले लक्ष 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्यांग मुलांची सावंतवाडी मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. यावेळी दिव्यांग मुलांनी जोरदार घोषणा देत शहरवासियांचे लक्ष वेधले. 'मिळून सारे ग्वाही देऊ, दिव्यांगांना सक्षम बनवू!', 'उठ दिव्यांगा जागा हो, समाजाचा तू धागा हो!', 'एकच निर्धार, दिव्यांगांना आधार!' अशा विविध घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला होता. 


दात्यांची 'सामाजिक बांधिलकी' 

'सामाजिक बांधिलकी'च्या माध्यमातून जी दिव्यांग मुलं खर्चा पायी दिव्यांग शाळेमध्ये येऊ शकत नाहीत, अशा गरीब मुलांना  गावातून शाळेपर्यंत आणि  पुन्हा घरी सोडणे या त्यांच्या सोयीसाठी नवीन व्हॅन घेण्याचा संकल्प सामाजिक बांधिलकी सावंतवाडीने केला. त्यासाठी प्रथम सामाजिक बांधिलकीचे अनिल परुळेकर यांच्याकडून २५ हजार रुपये प्राप्त झाले. तर पंचम खेमराज महाविद्यालय माजी प्राध्यापक सुभाष गोवेकर यांनी १० हजार रुपये जाहीर केले. या उपक्रमासाठी दाते स्वतःहून पुढाकार घेत आहेत.