
सिंधुदुर्गनगरी : कृषी विज्ञान केंद्र किर्लोस मार्फत कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत शेतकरी गटांचे दोन दिवसीय प्रशिक्षण किर्लोस येथे आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या सुरूवातीला आत्माच्या उपसंचालक श्रीम. प्रगती तावरे यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतीमध्ये गरजेनुसार जैविक निविष्ठांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थीना केले. जैविक निविष्ठांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो व साहजिकच उत्पादनात वाढ होते, शेतीमधील खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती महत्वाची आहे अस त्या म्हणाल्या.
कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. देशी गाईचे शेण व गोमूत्र पासून बनविलेले जीवामृत हे नैसर्गिक शेतीचा खरा पाया आहे. नैसर्गिक शेती पद्धतीने जमीन सुदृढ बनते व पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच देशी गांडूळांची संख्या वाढल्यामुळे जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे होते व पिकांचे उत्पादन वाढते. कृषि विज्ञान केंद्रामध्ये जैविक निविष्ठा संसाधन केंद्र सुरू केले आहे. त्याद्वारे शेतकर्यांाना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येत आहे असे बाळकृष्ण गावडे म्हणाले. सदर प्रशिक्षणामध्ये 40 शेतकरी व 04 कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणास आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश गोसावी, मास्टर ट्रेनर प्रताप चव्हाण, मंडळ कृषि अधिकारी विजय घोंगे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई, विवेक सावंत भोसले, संगणक सहाय्यक सुमेधा तावडे, संशोधन सहाय्यक सिद्धेश गावकर, अधिकारी व कर्मचारी मंगेश पालव, नरेंद्र सावंत, झिलू घाडीगावकर , अरुण पालव व सुधीर पालव उपस्थित होते.
सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रक्षेत्र व्यवस्थापक विवेक सावंतभोसले व सिद्धेश गावकर यांनी जीवामृत, अग्निअस्त्र, इ. निविष्ठा निर्मितीची प्रात्यक्षिके दाखवली. तसेच नव्याने निर्माण केलेल्या जैविक निविष्ठा संसाधन केंद्राची सखोल माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाचे समन्वयक विकास धामापूरकर होते.