
सावंतवाडी : सावंतवाडीच्या विकासप्रक्रियेत मोलाचे योगदान देणाऱ्या स्व. अजित पवार यांची अकाली एक्झिट ही मनाला चटका देणारी असून कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेशी आपुलकीने वागणारा दिलदार व धुरंधर लोकनेता आपण गमावल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी सावंतवाडीच्या विकासात अजित पवार यांनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
या शोकसभेला सावंतवाडी तालुक्यातील सर्व पक्षांतील स्थानिक नेते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी राज्याचे नेते स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या. शोकसभेत बोलताना स्थानिक नेते म्हणाले की, विकासप्रक्रियेत अजितदादांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. आपल्या शब्दाला किंमत देणारा, कार्यकर्त्यांना आपुलकीने वागवणारा असा धुरंधर नेता आपण हरपला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिलेले काम तात्काळ करून देणारा, सर्वांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे अजितदादा पवार होते. प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती. विकासकामांच्या मागणीपत्रांची ते तात्काळ दखल घेत आणि कामे मार्गी लावत असत. कार्यकर्त्यांना सन्मान देणारा नेता हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. युद्धामध्ये राजा किंवा सेनापती धारातीर्थी पडल्यावर जसे सैन्याचे मनोबल खचते, तशीच अवस्था अजितदादांच्या निधनाने कार्यकर्त्यांची झाली आहे. मात्र, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून त्यांचे कार्य त्याच ताकदीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून या शोकसभेच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, व्हिक्टर डोन्टस, ॲड दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, रुपेश राऊळ, अशोक दळवी पुंडलिक दळवी, मधुकर देसाई, रवींद्र म्हापसेकर, नारायण राणे, देवेंद्र टेमकर, अजय गोंदावळे, उमाकांत वारंग, गुरु मठकर विशाल बांदेकर, शफिक खान, समीर वंजारी, रोहित नाईक, बाशित पडवेकर, सत्यवान बांदेकर, परीक्षेत मांजरेकर, विनोद सावंत, नगरसेविका शर्वरी धारगळकर, नगरसेविका सायली दुभाषी, पूजा आवारी, हर्षा जाधव, आधी पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.










