'उबाठा'कडे उमेदवारच नाहीत, ग्रामीण जनता विकासाच्या पाठीशी

आ. निलेश राणे यांचा घणाघात
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 01, 2026 17:19 PM
views 29  views

कुडाळ : "शिवसेना (उबाठा) गटाकडे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारच उरलेले नाहीत. त्यांनी धरून-पकडून आणि जबरदस्तीने लोक उभे केले आहेत, जे आता स्वतःच्याच नेत्यांना शिव्या घालत आहेत," अशा शब्दांत आमदार निलेश राणे यांनी उबाठा गटावर जोरदार टीका केली. सिंधुदुर्गातील उबाठा युनिट हे पूर्णपणे 'रिकामटेकडं' असून आम्ही त्यांच्या टीकेची दखलही घेत नाही, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

निवडणुकीत ५० पैकी ५० जागा जिंकणार

जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १७ जागा बिनविरोध झाल्याबद्दल बोलताना राणे म्हणाले की, विरोधकांना उमेदवारच सापडलेले नाहीत. ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांना आपण उमेदवार आहोत हेच माहिती नाही. निवडणूक संपली की हे लोक उबाठा गटात दिसणारही नाहीत. आमचे लक्ष्य जिल्हा परिषदेच्या ५० पैकी ५० आणि पंचायत समितीच्या १०० पैकी १०० जागा जिंकण्याचे असून लोकांनी आमच्या कामावर विश्वास दाखवला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय अर्थसंकल्प: 'ट्रिलियन इकॉनॉमी'कडे वाटचाल

केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना निलेश राणे म्हणाले की, "मी सध्या प्रचारात व्यस्त असल्याने अर्थसंकल्प पूर्णपणे पाहिलेला नाही, मात्र मोदी सरकार नेहमीच प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम करते. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता, हा अर्थसंकल्प गेल्या वर्षीपेक्षाही सरस असेल. देशाला ज्या 'ट्रिलियन इकॉनॉमी'कडे न्यायचे आहे, त्या दिशेने ही सकारात्मक पावले आहेत."

अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नियोजित दौरे सध्या पुढे ढकलण्यात आले आहेत.  नेरुरमधील '१० खोके' बॅनरबाबत बोलताना त्यांनी मनसेला टोला लगावला. "बॅनर तर कोणीही काहीही लावू शकतो, मी तुमचा वाढदिवसाचाही लावू शकतो, बॅनर लावण्याला अर्थ नसतो. त्याचा नेमका अर्थ काय हे लावणाऱ्यांनाच विचारा," असे ते म्हणाले.  ग्रामीण भागातील जनतेने केवळ विकासाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला असून विरोधकांकडे केवळ टीका करण्यापलीकडे काहीही उरले नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.