
सावंतवाडी : बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमधील भीती आणि मानसिक दडपण दूर करण्यासाठी, स्थानिक कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना... ताणतणाव व्यवस्थापन व आहार’ या विषयावर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना अनमोल कानमंत्र दिला.
नियोजनबद्ध अभ्यासाचे महत्त्व
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा सत्रांमध्ये अभ्यासाचे विभाजन कसे करावे, याची सविस्तर माहिती देण्यात आली.
अभ्यासाचे छोटे टप्पे करून दररोजचे लक्ष्य पूर्ण करणे, नियमित उजळणी, लेखन सराव आणि वाचन या चतुःसूत्रीवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. मार्गदर्शक डॉ. गौरी गणपते (स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ) यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, केवळ अभ्यास करून चालणार नाही, तर सातत्यपूर्ण अभ्यासासोबत योग्य आहार, पुरेशी झोप आणि ध्यानधारणा यांचा समतोल साधल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता निश्चितच वाढते."
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जंक फूड पूर्णपणे टाळावे, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून सोशल मीडियापासून दूर राहावे, दररोज किमान १० मिनिटे ध्यानधारणा करावी असं सांगितलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे होते, त्यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. संस्थेच्या संचालिका श्रीमती टिपणीस व श्रीमती नेवगी यांनीही विद्यार्थ्यांना आत्मविश्वास राखून परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग डी. ई. यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती कदम एम. एम. यांनी मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.










